esakal | Video : विषाणूपेक्षा जलदगतीने पसरताहेत अफवा, टोमॅटोवर आला म्हणे विषाणू; पोलिसात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

tomato.

टोमॅटो या भाजीवर्गीय पिकाला कोरोनापेक्षाही भयंकर अशा कथित 'तिरंगा' विषाणूचा संसर्ग झाला असल्याची धादांत खोटी बातमी कुठलेही सत्य वा तथ्य न तपासता एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली. त्यानंतर सोशल मीडियावरून ही खोटी बातमी व्हायरल झाली.

Video : विषाणूपेक्षा जलदगतीने पसरताहेत अफवा, टोमॅटोवर आला म्हणे विषाणू; पोलिसात तक्रार

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ)  : कोरोनापेक्षाही भयंकर विषाणू टोमॅटो पिकावर आला असल्याचे धादांत खोटे वृत्त जाणीवपूर्वक एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आले. तसेच सोशल मीडियावरही ही बातमी व्हायरल होत आहे. सदर खोटे वृत्त पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव व टोमॅटो उत्पादकांनी महागाव पोलिसात शनिवार ता.१६ रोजी दाखल केली. महाराष्ट्रातील ही पहिली तक्रार असून पोलिस चौकशी करीत आहे.


टोमॅटो या भाजीवर्गीय पिकाला कोरोनापेक्षाही भयंकर अशा कथित 'तिरंगा' विषाणूचा संसर्ग झाला असल्याची धादांत खोटी बातमी कुठलेही सत्य वा तथ्य न तपासता एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली. त्यानंतर सोशल मीडियावरून ही खोटी बातमी व्हायरल झाली. परिणामतः टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला. यापूर्वीही कोरोनाचा कोंबड्यांना संसर्ग होत असल्याची खोटी बातमी पसरवून पोल्ट्री उद्योग रसातळाला नेण्याचा प्रकार घडला. याचा फटका मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांना बसला. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. त्याच प्रकारे आता टोमॅटो उत्पादकांचेही नुकसान करण्याचा हा घाट असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते मनीष जाधव यांनी केला आहे.
टोमॅटोवरील विषाणूचा संबंध थेट मानवी संसर्गाची जोडून तथ्यहीन व खोटी माहिती वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आल्याने सामान्य ग्राहक संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आल्याची भीती व्यक्त होत आहे. या कथित विषाणू संदर्भात कृषी खाते व कृषी तज्ज्ञांचा कुठलाही अभिप्राय घेण्यात आलेला नाही. एखादी बातमी जनसामान्यांच्या हितासाठी प्रसारित करताना तथ्य तपासले जाण्याची गरज असताना टोमॅटोवरील विषाणूचा खोटा प्रसार करण्यात आल्याने दोषींविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी तक्रार महागाव पोलिसात करण्यात आली. यासंदर्भात राज्याचे गृहखाते व कृषी विभागाने या खोट्या प्रसारणावर खुलासा करावा. कृषिमंत्र्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सविस्तर वाचा - दीड महिन्यापासून बंद दुकाने उघडली आणि...

शेतक-यांची आर्थिक कोंडी
टोमॅटोवरील कथित विषाणूची चुकीची माहिती प्रसारित करून राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. शेतकऱ्यांचे टोमॅटो शेतातच पडले असून त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. खोटी माहिती पसरविणाऱ्या माध्यमांवर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात खुलासा करावा.
मनीष जाधव
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
वाकद ईजारा ( जि. यवतमाळ)

loading image