esakal | शेतकऱ्यांनो खुशखबर! धान उत्पादकांना मिळणार बोनस; हमीभावात होणार वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

rupees 700 bonus announced for rice farmers in Gadchiroli district

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील काही भागात धानाचे पीक घेतल्या जात असून यावर्षी चांगले पीक होणार असे दिसत असतानाच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आलेली पूरपरिस्थिती तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले

शेतकऱ्यांनो खुशखबर! धान उत्पादकांना मिळणार बोनस; हमीभावात होणार वाढ

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत धानखरेदीमध्ये सुरू असलेल्या 1800 रुपये हमीभावात थेट सातशे रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर केल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे. विशेष म्हणजे सातशे रुपयांची वाढ झाल्याने आता शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये हमीभाव मिळणार असल्याची माहिती राज्याचे मदत, पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील काही भागात धानाचे पीक घेतल्या जात असून यावर्षी चांगले पीक होणार असे दिसत असतानाच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आलेली पूरपरिस्थिती तसेच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

सविस्तर वाचा - दुर्दैवी! फराळाचे पदार्थ करताना अचानक घरात पसरला धूर आणि क्षणाधार्त संसाराची झाली राखरांगोळी

पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तथा वर्धा या पाचही जिल्ह्यांत धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असून वर्षाकाठी हे एकमेव पीक या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येत असल्याने यावर शेतकऱ्यांची आर्थिक घडी अवलंबून आहे. या जिल्ह्यामध्ये विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यांत यंदा धानपिकावर अतिवृष्टी, पूरस्थिती आणि रोगराई या नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला. येथील विदारक परिस्थितीची पाहणी विजय वडेट्टीवार यांनी स्वतः शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन केली आणि स्वतः च्या विभागाकडून मदत सध्या जाहीर केली आहे. 

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य सरकारने पत्र पाठविले असता थेट केंद्रीय पथकही येऊन गेले मात्र केंद्राकडून अद्याप ठोस अशी भरीव मदत मिळाली नाही. एकंदरीत ही परिस्थिती बघता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या धानपिकाला हमीभाव वाढवून देण्यासाठी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव ठेवला. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 700 रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 मागील वर्षी असलेला 1800 रुपयांचा हमीभाव कायम असला, तरी त्यात 700 रुपये बोनसची भर पडल्याने आता शेतकऱ्यांकडील धानखरेदी  2500 रुपये दराने होणार आहे.

जाणून घ्या -थरारक घटनाक्रम : मध्यरात्री घरात शिरले दरोडेखोर; बापलेकावर हल्ला केल्यानंतर शस्‍त्र टाकून काढला पळ

केंद्र लवकर सुरू करा

सध्या धानपीक पक्‍व झाले असून अनेक ठिकाणी धानाची कापणी झाली आहे. पण, जिल्ह्याच्या कित्येक भागांत अद्याप धानखरेदी केंद्र सुरू झाले नाही. दरवर्षी धानखरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असल्याने याचा फायदा खासगी व्यापारी उचलतात. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आपले धान कवडीमोल दराने व्यापाऱ्यांना विकावे लागतात. म्हणून धानखरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top