ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा प्रभार काढा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

नागपूर - उन्हाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी  असताना पाणीटंचाई निवारणाची कामे मंद गतीने सुरू आहेत. परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड  द्यावे लागत आहे. या विभागाचा प्रभार असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रभार त्वरित काढण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी केली आहे.

नागपूर - उन्हाळा संपण्यास महिनाभराचा कालावधी  असताना पाणीटंचाई निवारणाची कामे मंद गतीने सुरू आहेत. परिणामी गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड  द्यावे लागत आहे. या विभागाचा प्रभार असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रभार त्वरित काढण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिखले यांनी केली आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे गेल्यावर्षीसुद्धा पाणीटंचाईची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तेच  चित्र यावर्षी कायम आहे. जिल्ह्यातील २४ गावांना ३८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असतानादेखील पाणीटंचाई निवारणाच्या कामाला गती आलेली नाही. सध्या या विभागाचा प्रभार लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे यांच्याकडे आहे. लघु सिंचन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हे दोन्ही महत्त्व पूर्ण विभाग आहे. वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. ग्रामीण भागात पहाटेपासूनच पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू होत असल्याचे चित्र आहे. तर, काही गावात दूरवरून पाणी आणून गावकरी पाण्याची गरज भागवित आहे.

मात्र, पाणीटंचाई निवारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध असूनदेखील केवळ अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे पाणीटंचाई निवारणाची कामे संथ गतीने सुरू आहे. आजवर ९०० बोअरवेलपैकी केवळ बोटावर मोजण्या एवढ्याच बोअरवेलची कामे झाली आहेत. तर, विहिरी अधिग्रहीत करण्याचे आदेश अद्याप न काढल्याचा आरोप चिखले यांनी केला आहे.

जलव्यवस्थापन समितीची सभा होणार वादळी
जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती असताना त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. सीईओंचा अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने पाणीटंचाई निवारणाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहे. हे मुद्दे ८ तारखेला होणाऱ्या जलव्यवस्थापन समिती सभेत सदस्य लावून धरणार असल्याने ही सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: rural watersupply department take charge