सहकार महर्षी म्हणतात, रोगप्रतिकार शक्‍ती वाढवून कोरोनासोबत जगा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

कोरोना संकट म्हणून आले असले, तरी त्याने मानवांना समान पातळीवर येऊन विचार करण्यास भाग पाडले आहे. बेभान धावणाऱ्या जगाची चाके काही काळ थांबवून चिंतनाला वाव दिला आहे.

गडचिरोली : सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले असून त्याच्यावर लवकरच लस किंवा नेमके औषध मिळण्याची शक्‍यता कमी आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा वेग तीव्र असला, तरी त्यातून बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. म्हणून सध्यातरी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनासोबत हिमतीने लढत जगण्याची सवय लावून घ्यावी. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आपल्या प्राचीन आयुर्वेद परंपरेचा व निसर्गोपचारांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले आहे. 

अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी म्हटले आहे की, देवी या रोगाची लस 1799 मध्ये तयार झाली होती. टीबीची लस 1921, तर पोलिओची लस 1950 मध्ये तयार झाली. तत्पूर्वी या रोगांनीही जगाला घाबरवून आणि वैज्ञानिकांना भंडावून सोडले होते. तब्बल 35 वर्षे संशोधन होऊनही एड्‌स, 18 वर्षे संशोधन होऊन सार्स व 8 वर्षे संशोधन झाल्यावरही मर्स या रोगांवर अद्याप लस तयार करता आली नाही. पण, कोरोनामुळे अगदीच घाबरून जायची किंवा हतबल होण्याची गरज नाही. अशा अनेक विषाणूंसोबत आपण आधीपासून जगत आहोत आणि पुढेही जगत राहू. त्यासाठी किमान 14 हजार वर्षांचा इतिहास असलेले आयुर्वेदशास्त्र आपल्या उपयोग येऊ शकेल. रोग झाल्यावर उपचार करण्याऐवजी तो होऊच न देणे नेहमी श्रेयस्कर असते. त्यासाठीच उत्तम रोगप्रतिकारशक्ती हवी. ही शक्ती आयुर्वेदिक वनौषधी व निसर्गोपचारातून आपण प्राप्त करून घेऊ शकतो.

या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांत टाळेबंदी करावी लागली. भारतातसुद्धा लॉकडाउन करण्यात आले. या लॉकडाउनमध्ये अधिक त्रास शहरांना झाला. ज्या छोट्या गावांमध्ये प्रत्येकाकडे शेती आहे, तिथेच सारे उत्पादन मिळते, अशा स्वयंपूर्ण गावांना याची कमी झळ बसली. शेवटी किमान मानवी गरजा (अन्न, वस्त्र, निवारा) भागविणारा परिसर बऱ्यापैकी तरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत वर्णीत केलेल्या स्वयंपूर्ण समाजरचनेचा विचार करणे अगत्याचे झाले आहे. मोठे उद्योग, बडेजाव, श्रीमंती, गरजेपेक्षा अधिक मिळवण्याचा हव्यास, नैसर्गिक संसाधनांची वारेमाप लूट, या सगळ्यांचे पितळ या निमित्ताने उघडे पडले आहे.

अवश्य वाचा- काकूच्या प्रेमात आकंठ बुडाला पुतण्या, काका ठरत होता अडसर... मग

कोरोना संकट म्हणून आले असले, तरी त्याने मानवांना समान पातळीवर येऊन विचार करण्यास भाग पाडले आहे. बेभान धावणाऱ्या जगाची चाके काही काळ थांबवून चिंतनाला वाव दिला आहे. पुन्हा आपल्या मुळांकडे परतण्याची आस दाखवली आहे. त्यामुळे या काळात नैराश्‍यग्रस्त न होता सकारात्मक विचारांवर मन केंद्रित करून पुढे जाणे आवश्‍यक आहे. मानवी जीवनचक्र हे बेधुंद वाहणाऱ्या नदीसारखे आहे. ते कधी संथपणे वाहते, तर कधी वेड्यागत खळखळून वाहते. म्हणून कोरोनाने जगण्याचा प्रवाह शिथिल झाला, तरी थांबला नाही आणि थांबणार नाही. त्यामुळे सर्वांनी सकारात्मक व्हावे, असे आवाहन पोरेड्डीवार यांनी केले. 

भाकीत ठरले खरे... 

अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी "कोरोना व ऋणानुबंध' हा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी भारताला संयुक्त राष्ट्र परिषदेत सदस्यत्व मिळण्याची आशा असल्याचे मत व्यक्त केले होते. विशेष म्हणजे 17 जून 2020 रोजी या परिषदेतील अस्थायी सदस्यांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत भारत विजयी झाला. त्यामुळे त्यांचे भाकीत खरे ठरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahakar Maharshi says, live with Corona by boosting your immune system