आज हिरवाईचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गुरुवारी (ता. ५) विदर्भात ‘ग्रीन डे’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. ‘ग्रीन डे’साठी विदर्भातील शेकडो शाळांमध्ये जय्यत तयारी झाली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

नागपूर - ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याला अनुसरून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गुरुवारी (ता. ५) विदर्भात ‘ग्रीन डे’ उपक्रम साजरा केला जाणार आहे. ‘ग्रीन डे’साठी विदर्भातील शेकडो शाळांमध्ये जय्यत तयारी झाली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि नागरिकांनाही या उपक्रमाबाबत मोठी उत्सुकता आहे. शाळांमध्ये वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी वृक्षदिंडी, रॅली, पालखी यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षदिंडीत विद्यार्थी आकर्षक पोषाखांसह सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील.. यावेळी त्यांच्या हातात वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनसंदर्भात विविध फलक राहणार आहेत. आकर्षक घोषवाक्‍ये आणि पोस्टर, बॅनरमुळे या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने केले आहे.  

आपल्‍या जीवनात आवश्‍यक असलेल्‍या फळझाडांची मांडणी आणि रंगसंगती आजच्‍या अंकात ‘ग्रीन डे’ उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

वनमंत्र्यांच्या हस्ते उद्या समारोप
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील काही विभागांना दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे. यामुळे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’मार्फत गेल्या वर्षीपासून ५ जुलैला ‘ग्रीन डे’ राबविला जात आहे. या उपक्रमास जोरदार प्रतिसाद मिळत असून राज्याच्या वनमंत्रालयानेदेखील याची दखल घेतली आहे. शुक्रवारी (ता. सहा) ‘ग्रीन डे’च्या समारोपाला महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. ‘सकाळ’च्या एमआयडीसी कार्यालयात सकाळी नऊ वाजता वनमंत्र्यांच्या हस्ते उपक्रमाचा समारोप होणार आहे.

ग्रीन डे शपथ
मी शपथ घेतो / घेते की, या सुंदर वसुंधरेवरील आमचे जीवन सुखकारक करणाऱ्या वृक्षांची लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी मी तन-मन-धनाने झटेन. सार्वत्रिक प्रदूषण आणि पर्यावरण ऱ्हासाच्या काळात या भूमीवरची हिरवाई वाढवणे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे हा उत्तम मार्ग आहे. यावर माझा ठाम विश्‍वास आहे. वृक्षांचे संगोपन आणि संरक्षण माझ्या आणि समस्त मानवजातीच्या अस्तित्वासाठी आवश्‍यक आहे. ही भावना सर्वांमध्ये रुजविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेन.

Web Title: sakal green day