सकाळ पेंडॉलला संसदीय कार्य मंत्रालयाचे पाठबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नागपूर - ‘सकाळ पेंडॉल’ गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. यातून केवळ वैयक्तिकच नव्हे, तर सामूहिक प्रश्‍नही विधिमंडळापुढे मांडले जातात. नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्‍न, तक्रारींची दखल घेतली जात असल्याने प्रतिसाद वाढत आहे. राज्य शासनाच्या संसदीय कार्य विभागाचे मंत्री गिरीश बापट यांनीही ‘सकाळ पेंडॉल’ या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. येत्या पावसाळी अधिवेशनापासून या उपक्रमाला विभागाचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

नागपूर येथे डिसेंबरमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन होते. परंतु, बऱ्याच वर्षांनंतर येत्या ४ जुलैपासून पावसाळी अधिवेशनही नागपुरात निश्‍चित झाले. विविध संघटना, संस्था आणि वैयक्तिक समस्या असलेले लोकही अधिवेशनाची आतुरतेने वाट पाहतात. वाढता प्रतिसाद पाहता राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी या उपक्रमात सहभागी व्हावेत, या हेतूने संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांची भेट घेतली असता नागरिकांच्या समस्या थेट शासनदरबारी मांडणाऱ्या ‘सकाळ’च्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या समस्यांची दखल घेणारा हा उपक्रम सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. यंदा अधिवेशन काळात आमच्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी त्यात सहभागी होतील. लोकांच्या तक्रारी, मागण्या संबंधित विभागांकडे पाठवतील. तसेच आम्हीदेखील त्याचा पाठपुरावा करू, असे आश्‍वासन बापट यांनी दिले.            

‘सकाळ पेंडॉल’मध्ये केवळ विदर्भातीलच नव्हे, तर राज्यभरातून लोक आपले प्रश्‍न, समस्या, गाऱ्हाणी आणि तक्रारींचे निवेदन घेऊन येतात. केवळ वैयक्तिकच नव्हे, तर सामूहिक प्रश्‍नही विधिमंडळापुढे मांडले जातात. कित्येक प्रश्‍न यातून मार्गी लागतात. तर अनेक प्रश्‍नांची दखल घेत त्यावर कार्यवाही सुरू होते. यातून कित्येक प्रश्‍न मार्गी लागतात. 

यंदाही आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी, समस्यांची निवेदने पाठवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

काय करायचे? 
समस्यांबाबतची आणि विविध कार्यालये आणि मंत्रालयांकडे या विषयावर पाठपुराव्याची झेरॉक्‍स केलेली सर्व कागदपत्रे यांचे दोन ‘बंच’ करा. एका ‘बंच’वर ‘संपादक, सकाळ’ या नावाने, तर दुसऱ्या ‘बंच’वर संबंधित मंत्रालयाच्या नावाने ‘कव्हरिंग’ लेटर जोडा. यावर तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहा. तुमचे छायाचित्र आणि समस्यांची संबंधित छायाचित्र जोडा. 

पाठविण्याचा पत्ता किंवा प्रत्यक्ष निवेदने आणून देण्याचा पत्ता - सकाळ पेंडॉल, संपादक, दैनिक सकाळ, २७४/१, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ, नागपूर - ४४००१०.
ई-मेल- sakalpendol@gmail.com 
संपर्कासाठी मोबाईल ः ९८५०२०९९४५

Web Title: sakal pendol mantraalaya girish bapat