अल्पवयीन मुलीची राजस्थानमध्ये विक्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नागपूर : दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे प्रेमीयुगुलाने अपहरण करून राजस्थानला नेले. लग्न लावून देण्याचा बहाणा करीत राजस्थानातील 50 वर्षीय शेटजीला 30 हजारांत विकले. वडिलांच्या सतर्कतेमुळे कळमना पोलिसांनी सोनाली प्रल्हाद शाहू (26) व स्वप्नील नरेंद्र नंदेश्‍वर (28) दोन्ही रा. चिखली वस्ती या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. 

नागपूर : दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे प्रेमीयुगुलाने अपहरण करून राजस्थानला नेले. लग्न लावून देण्याचा बहाणा करीत राजस्थानातील 50 वर्षीय शेटजीला 30 हजारांत विकले. वडिलांच्या सतर्कतेमुळे कळमना पोलिसांनी सोनाली प्रल्हाद शाहू (26) व स्वप्नील नरेंद्र नंदेश्‍वर (28) दोन्ही रा. चिखली वस्ती या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. 

कळमन्यात मजूर दाम्पत्य राहते. त्यांना तीन मुली असून, मोठी मुलगी निशा (बदललेले नाव) ही दहावीत शिकते. त्यांची शेजारी सोनालीशी ओळख झाली. ती विवाहित असून, पतीपासून विभक्‍त राहते. स्वप्नील नंदेश्‍वर या युवकासोबत ती "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहते. सोनालीने निशाशी मैत्री करीत आपलेसे केले. तिला घरी बोलावून राजस्थानमध्ये लग्न लावून देण्याचे स्वप्न दाखविले. सोनालीने प्रियकर स्वप्नीलशी संगनमत करून निशाची राजस्थानात विक्री करण्याचे ठरविले. 

26 नोव्हेंबरला निशाला राजस्थानमध्ये फिरायला जायचे असल्याचे सांगून अपहरण केले. तिला राजस्थानमध्ये शेटजीच्या घरी ठेवले. तिथे 50 वर्षीय शेटजीशी लग्न लावून देण्याचा देखावा केला. निशाला लग्न लावून दिल्याचे सांगून सोनाली व स्वप्नील नागपूरला परतले. निशाचे आई-वडील मुलीचा शोध घेत होते. त्यांनी सोनालीला मुलीबद्दल विचारले असता तिने पळून जाऊन लग्न केल्याचे सांगून हाकलून दिले. त्यामुळे निशाच्या वडिलाने कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना अटक केली. 

लाखोंची कमाई 
यापूर्वीही अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एप्रिल महिन्यात अल्पवयीन मुलीची राजस्थानला विक्री केल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच सक्‍करदरा परिसरात तर चक्‍क विदेशात महिलेची विक्री केल्याचे उघडकीस आले होते. सोनाली व स्वप्नीलसारखे दलाल अल्पवयीन मुलींना फूस लावून राजस्थानमध्ये शेटजींना विकतात. यातून दलाल लाखोंची कमाई करतात.

पोलिस जाणार राजस्थानला 
निशाची सुटका करण्यासाठी तसेच अल्पवयीन असताना लग्न करणाऱ्या किंवा खरेदी करणाऱ्या शेटजीला अटक करण्यासाठी कळमना पोलिसांचे पथक मंगळवारी राजस्थानला जाणार आहे. दोन्ही आरोपींनाही सोबत नेणार असून, आतापर्यंत निशासारख्या किती मुलींना राजस्थानात विकले? याची माहिती पोलिस काढणार आहे.
 

Web Title: Sales of a minor girl in Rajasthan