शेतकरीकन्येचा जिद्दीचा प्रवास...परिस्थितीशी झगडत तिने गाठले यशोशिखर

karishma
karishma

गोंडपिपरी : दीड एकर शेतात राबून आपल्या कुटुंबाचे रहाटगाडगे चालविणारे एक गरीब शेतकरी दाम्पत्य अत्यंत आनंदात आहे. कारण त्यांच्या मुलीने दाखविलेला करिष्मा. काल लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल लागला. त्यात या शेतकरीकन्येने बाजी मारली. गावातील करीष्मा पीएसआय झाल्याची माहिती कळताच अनेकांनी आंनदोत्सव साजरा केला.
गोंडपिपरी तालुक्‍यातील कुडेसावली हे जेमतेम 900 लोकसंख्येचे गांव. मात्र या गावाला शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. गावातील बापूजी मोरे हे आपल्या दिड एकर शेतीच्या माध्यमातून कुटुंबाचा गाडा चालवितात. करिष्मा ही त्यांची लहान मुलगी. तिचे प्राथमिक शिक्षण कुडेसावलीतच झाले. त्यानंतर येनबोडी येथील कर्मवीर विद्यालयातून तिने माध्यमिक शिक्षण पुर्ण केले. मोठा भाऊ अमोल मोरे हा चंद्रपूरला रहात असल्याने तिने नंतर एफईएस महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पुर्ण केले.
कुटुंबियांची परिस्थिती बघता केवळ स्पर्धा परीक्षाच आपले भविष्य घडवू शकते याची जाणीव करिष्माला होती. यातूनच तिने पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. 2018 या सत्रात एमपीएससीची पीएसआय पदाकरिता जाहिरात निघाली. ही नोकरी मिळवायचीच हे ठरवून ती पुण्याला गेली. परीक्षाकरिता वेळ कमी असतानाही तिने प्रचंड परिश्रम घेतले. सातत्याने अभ्यास केला. परीक्षा दिली. पुर्व परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आव्हान होते ते मुख्य परिक्षेचे. यातही करिष्मान यश मिळविले. यानंतर फिजीकलची पायरी तिने गाठली. आयोगाने तब्बल दोन वर्षानंतर निकाल लावले. काल दुपारी पीएसआय पदाचा निकाल जाहीर झाला. करिष्मा या परीक्षेत उत्तीर्ण झाली.
आपली मुलगी पिएसआय होणार ही बातमी आईवडिल,भाऊ व कुटुंबियांना कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. करीष्माने मिळविलेल्या यशाबद्दल गावातील अनेकांनी आनंदोत्सव साजरा केला. कुडेसावलीचे सरपंच मारोती मडावी,उपसरपंच राजेश डोडीवार यांनी करिष्माला शुभेच्छा देत आपणास तिचा अभिमान असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी
राज्याच्या सीमावर्ती भागात असणा-या गोंडपिपरी तालुक्‍यातील अनेक तरूणांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. आता करिष्माने मिळविलेल्या यशातून प्रेरणा घेत अनेक तरूण परिश्रम घेत आहेत.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्या मुंबईतील विद्यार्थ्यांची घरवापसी, पालकांचा जिवात जीव
भावाची मदत
करिष्माचा भाऊ अमोल हा चंद्रपूरला असतो. त्याचा एक लहानसा व्यवसाय आहे. करिष्माचा स्पर्धा परीक्षेकडे असलेला कल व तिची इच्छाशक्ती लक्षात घेता अमोलने तिला प्रोत्साहन दिले. भाऊ म्हणून तिची जबाबदारी खांद्यावर घेतली. करिष्माने आईवडिलांसह आपल्या भावालाही यशाचे श्रेय दिले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com