तिच्या जिद्दीला सलाम : "सेरेब्रल पाल्सी'वर मात करीत "ती' बनली अधिकारी 

वडील अनिल, आई मंगला, भाऊ आशीष सोबत मोनिका जयस्वाल.
वडील अनिल, आई मंगला, भाऊ आशीष सोबत मोनिका जयस्वाल.
Updated on

पुसद (यवतमाळ): दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अपंगत्वावर मात करून उच्च ध्येय गाठता येते. "सेरेब्रल पाल्सी'ने जन्मत: दिव्यंगत्व आलेल्या पुसद येथील मोनिका अनिल जयस्वाल या तरुणीने "इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग परसोनेल सिलेक्‍शन' या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले. तिची युनियन बॅंकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. 

स्पर्धा परीक्षेत मिळविले यश 

मोनिकाचे शालेय शिक्षण एम. पी. एन. कॉन्व्हेंटमध्ये झाले. अकरावी, बारावी महिला महाविद्यालयातून केल्यानंतर तिने व्हील चेअरमधूनच फुलसिंग नाईक महाविद्यालयात बी.एस्सी व नंतर गणित विषयात एम.एस्सी 2019 मध्ये पूर्ण केले. शरीराने दिव्यांग असली तरी मनाने मोनिका खंबीर आहे. तिने स्पर्धा परीक्षांकडे लक्ष वळविले . बॅंकेत अधिकारी बनण्याचे ध्येय निश्‍चित केले व त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पहिल्याच प्रयत्नात तिने इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग परसोंनेल सिलेक्‍शन या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. बॅंक प्रोबेशनरी ऑफिसर तसेच क्‍लर्क या दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण केल्या. अवघ्या तेविसाव्या वर्षी दिव्यंगात्वर मात करून बॅंक अधिकारी होण्याची किमया मोनिकाने साधली. 

आईवडिलांचे सहकार्य 

तिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल कौतुक होत आहे. तिचे वडील कृषी केंद्राचे संचालक आहेत. आई मंगला गृहिणी असून, मोठा भाऊ आशीष जयस्वाल याने मुंबई व पुणे येथील कंपनीत मोठ्या पदावर काम केले आहे. सेरेब्रल पाल्सी एक अप्रगतिशील नुरोलॉजिकल समस्या आहे. यात मुलांमधील विकसनशील मेंदूला दुखापत किंवा विकृती निर्माण होते. बालपणातील गंभीर दिव्यंगत्वाचे हे सामान्य कारण आहे. यामध्ये स्नायूंची शक्ती कमी होत असल्याने मोनिका आधाराशिवाय उभी राहू शकत नाही. अशाही अवस्थेत मोनिकाने उच्च शिक्षण पूर्ण करून बॅंकेतील प्रोबेशनरी ऑफिसर ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ही बाब यवतमाळ जिल्ह्यासाठी गौरवाची आहे. 

"माय स्टॅम्प"द्वारे गौरव 

मोनिकाच्या यशाची दखल घेत भारतीय डाक विभाग यवतमाळ डाकघर जिल्हा अधीक्षक मनोहर पत्की यांनी तिच्या घरी जाऊन सत्कार केला. तिला भारतीय डाक विभागातर्फे 'माय स्टॅम्प' हा तिचा स्वतःचा फोटो असलेला व चलनातील पाच रुपयाच्या बारा तिकिटांचा संच भेट दिला. यावेळी योगशिक्षक शरद बजाज, गौरव पांडे, संजय सोनटक्‍के, विठ्ठल गायकवाड, सचिन तोडकर, नागनाथ कबीर,गणेश डाकोरे उपस्थित होते. 

खरे म्हणजे मला प्राध्यापक बनायची इच्छा होती. परंतु दिव्यांगत्वामुळे शक्‍य नव्हते. त्यामुळे बॅंकिंग सेक्‍टरची निवड केली. पहिल्याच प्रयत्नात युनियन बॅंकेत प्रोबेशनरी अधिकारी म्हणून निवड झाली. त्यासाठी चार महिने कोचिंग घेतले व सेल्फ स्टडीला वेळ दिला. शरीराने दिव्यांग असले तरी हरकत नाही. मात्र मनाने दिव्यांग असू नये, असे मला वाटते. 
-मोनिका जयस्वाल, पुसद 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com