मोझरीत सोमवारी माहेरवासींचे संमेलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) :  ज्ञानार्जन, धनार्जन, संशोधन अथवा संरक्षण असल्या कोणत्या तरी कार्यासाठी जन्मगाव सोडून कर्तव्यावर बाहेरगावी गेलेल्या माहेरवासींचा स्नेहमीलन सोहळा सोमवारी बलिप्रतिपदेला (ता. 28) आयोजित करण्यात आला आहे.

गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) :  तब्बल 54 वर्षांपासून ही परंपरा कायम असून, यानिमित्ताने गावखेड्यातील परंतु उच्च पदांवर पोहोचलेले महिला व पुरुष अधिकारी, कर्मचारी एकत्र येणार आहेत. माहेरवासींचा स्नेहमीलन सोहळा सोमवारी बलिप्रतिपदेला (ता. 28) आयोजित करण्यात आला आहे.
दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने सर्वसाधारणपणे प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ लागते. गावात आल्यावर जुन्या मित्रांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, सुख-दुःख सांगणे व एकमेकांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु, प्रत्येकाच्या घरी जाणे शक्‍य होत नसल्याने गुरुकुंज मोझरीत माहेरवासी संघाची स्थापना 54 वर्षांपूर्वी करण्यात आली. एकत्र आलेल्यांनी गप्पा माराव्यात तसेच विरंगुळा व उद्‌बोधन ऐकावे व त्यानंतर दिवाळीचा फराळ एकत्रितपणे करून आनंदोत्सव साजरा करावा, अशी संकल्पना आहे. या कार्यक्रमाला बाहेरगावी नोकरीच्या निमित्ताने गेलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून अभियंते, शिक्षक, प्राध्यापक ते शिपायापर्यंतचे सर्व कर्मचारी उपस्थित राहतात.
अमरावती जिल्ह्याच्या कोणत्याही तालुक्‍यात किंवा गावात असा कार्यक्रम होत नाही. त्यामुळे मोझरीने या निमित्ताने आपले वेगळेपण जपले आहे.
यंदा सोमवारी (ता. 28) होत असलेल्या या स्नेहसंमेलनात अकोट येथील नरेंद्र इंगळे यांचा "गुल्लेर' हा वऱ्हाडी कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अकोला येथील पीएसआय रणजित ठाकूर, स्वप्नील खेरडे, आकाश निमकर, महाराष्ट्र पोलिस दलातील चेतन ठाकरे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकरराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या वेळी संघाचे गजानन खारोडे, शशिकांत डहाके, विनोद शेळके, नीरज भिवगडे, शरद कांडलकर, गणेश उमप, नीलेश वडस्कर आदी उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sammelan of the Maherwasi on Monday in Mozari