महसूल अधिकाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर ‘मर्सिडीज बेंझ’ कार चढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सकाळी दिघोरी चौक परिसरात खरबी मार्गावर ही थरारक घटना घडली. मात्र, अधिकारी दक्ष असल्याने सर्वजण थोडक्‍यात बचावले.

नागपूर - वाळूमाफियांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर ‘मर्सिडीज बेंझ’ कार चढवून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंगळवारी सकाळी दिघोरी चौक परिसरात खरबी मार्गावर ही थरारक घटना घडली. मात्र, अधिकारी दक्ष असल्याने सर्वजण थोडक्‍यात बचावले.

भंडाऱ्यातील वैनगंगा नदी पात्रातून अवैध उपसा करून चोरट्या मार्गाने उपराजधानीत मोठ्या प्रमाणावर वाळू आणली जाते. थोडी रिस्क घेतल्यास मोठ्या प्रमाणावर पैसा मिळत असल्याने राजकीय मंडळींसह गुन्हेगारही या व्यवसायात सक्रिय झाले आहेत. पारडी परिसर, दिघोरी, उदयनगर आदी भागात वाळू भरलेले ट्रक, टिप्पर मोठ्या संख्येने उभे असतात.

वाळूतस्करांवर कारवाईसाठी नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी मुकुंद मडावी, मलिये आणि तलाठी परेश बैस, सुनील शिंदे, तुषार सोमलकर, अजय चव्हाण, कोतवाल धार्मिक हे मंगळवारी सकाळी दिघोरी चौकाजवळ खरबी रोडवर उभे होते. वाळू भरलेले दोन ट्रक जाताना दिसताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून घेतले. 

एमएच ४०- ए.के. ८०५६ व एमएच ३६-एफ. ४१५७ क्रमांकाचे ट्रक रस्त्याच्या कडेला थांबून कारवाई करीत असतानाच  रस्त्यावरून एमएच ४१- ए. ए.८१०० क्रमांकाची ‘मर्सिडीज बेंझ’ कार वेगाने आली. कारचालकाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत सर्वजण बाजूला झाले. यानंतर कारमधील व्यक्तीने अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणे सुरू केले. ट्रकचालकांना ट्रक पुढे दामटण्याची चिथावणी दिली. त्याचवेळी ट्रकचालक आणि स्वत: बेंझचालक वाहनासह पसार झाले. 

शिवीगाळ करणारा मर्सिडीज बेंझचा मालक ट्रकचादेखील मालक असावा, असा संशय आहे. या घटनेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. त्यांनी थेट नंदनवन ठाणे गाठून तक्रार दाखल केली. आरोपी अनोळखी असले तरी अधिकाऱ्यांनी वाहनांचे क्रमांक टिपले आहेत.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Sandmafia Revenue Officer Trying to crush Crime