दिलासादायक : आता अकोल्यातच तयार होणार सॅनिटायझर

भगवान वानखेडे
रविवार, 29 मार्च 2020

‘कोरोना’ विषाणूचा प्रसार वाढला असून, खबरदारीचा उपाय म्हणून ‘सॅनिटायझर’चा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

अकोला : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्स निर्मितीची परवानगी मिळाल्यानंतर अकोला औद्योगिक परिक्षेत्रातील एका कंपनीत आता हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती केली जाणार आहे. या कंपनीला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अल्कहोलचा पुरवठा होत असून, लवकरच अकोल्यातून वऱ्हाडासाठी हॅंड सॅनिटायझरचा पुरवठा केला जाणार आहे.

‘कोरोना’ विषाणूचा प्रसार वाढला असून, खबरदारीचा उपाय म्हणून ‘सॅनिटायझर’चा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी अत्यावश्‍यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्यांना ‘सॅनिटायझर’ चे वाटप केले आहे. ‘सॅनिटायझर’ चा दोन आठवड्यापासून वापर वाढला आहे. त्यामुळे ‘सॅनिटायझर’ चा तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा - गर्भवती महिलेला शासकीय वाहनाने घेऊन आला; तरी चालकाला पोलिसांनी केली मारहाण

मद्य, आणि साखर कारखान्यात अल्कोहोलपासून ‘सॅनिटायझर’ निर्मिती होऊ शकते याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्याना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार अकोल्यातील काही कंपनी मालकांनी सॅनिटायझर निर्मितीसाठी परवान्यासाठी अन्न व औषध विभागाकडे धाव घेतली आहे. सध्या अकोल्यातील एमआयडीसीमधील एका कंपनीला सॅनिटायझर निर्मितीचा परवाना देण्यात आला असून, पुढील काही दिवसांत या कंपनीचे हॅंड सॅनिटायझर बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे.

आवश्‍यक वाचा - डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आता मिळणार नाही हे औषध

आणखी एका कंपनीला दिला जाणार परवाना
अन्न व औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीला देण्यात आलेल्या परवान्यानंतर आता दुसरी कंपनीही परवान्याठी अप्लाय करणार आहे. तेव्हा तीन हजार 750 रुपये भरून हा परवाना देण्यात आला आहे. तर सरकारने सॅनिटायझरची निर्मिती करणाऱ्या कंपनीला 24 तासांत परवाना देण्याच्या सूचना दिल्या होत्या. अकोल्यात हा परवाना दोन तासांत देण्यात आला.

दिवसाला ऐवढी होणार निर्मिती
या कंपनीत दिवसाला 250 बॉक्स हॅंड सॅनिटायझरची निर्मीती केली जाणार आहे. एका बॉक्समध्ये 90 मिलीच्या 100 बॉटल्या असणार आहे. तेव्हा दिवसाला 25 हजार सॅनिटायझरच्या बाटल्या तयार केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हॅंड सॅनिटायझरची निर्मिती करणारी  ही कंपनी अकोला, बुलडाणा, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यातील एकमेव ठरणार आहे.

वऱ्हाडातील हॅंड सॅनिटायझरचा तुटवडा मिटणार
अकोल्यात तयार होणार असलेल्या सॅनिटायझरमुळे आता वऱ्हाडातील हॅंड सॅनिटायझरचा तुटवडा मिटणार आहे. परवाना देण्यात आलेल्या कंपनीत लवकरच हॅंड सॅनिटायझरची निर्मिती होणार आहे.
-हेमंत मेटकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध विभाग, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanitizer will now be ready in Akola