परवाच सुटी संपवून गेला आणि तीच ठरली अखेरची भेट...

Sanjay Rajput
Sanjay Rajput

नांदुरा/मलकापूर : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने काल (ता. 14) केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात मलकापूर येथील संजय राजपूत या जवानाचा समावेश असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मलकापूर येथील वार्ड नं. 21, लखानी प्लॉटमध्ये लहानाचे मोठे झालेले शहीद जवान संजय भिकमसिंग राजपूत यांनी 1996 मध्ये सीआरपीएफमध्ये रूजु झाले. पहिली पोस्टिंग त्रिपुरा येथे झाली. 11 वर्षाची देशसेवा केल्यानंतर पुन्हा 5 वर्षे सेवा वाढवून घेतल्यानंतर काल (ता. 14) जम्मू काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले. या भ्याड हल्ल्याचे वृत्त जिल्ह्यात पोहचताच बुलडाणा जिल्ह्यासह मलकापुरमध्ये शोककळा पसरली आहे.

संजयला एक बहीण असून ती सुरतला राहते. विशेष म्हणजे सुरत येथील संजयचा भाचा पियुष बयस यांच्यासोबत संजयचे दु 1:30 वाजता जम्मूवरून श्रीनगरकडे जाताना भ्रमणध्वनी वर बोलणे झाले होते. हा संजयचा शेवटचाच कॉल ठरला. संजयचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मलकापूर येथील नूतन विद्यालयात झाले असून अकरावी व बारावी जनता कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सीआरपीएफ मध्ये दाखल झालेल्या संजयला वीरमरण प्राप्त झाल्याचे वृत्त समजताच मलकापूर शहरावर शोककळा पसरली आहे.

मलकापूरचे शहीद जवान संजय राजपूत यांना जय (वय 12) व शुभम (वय 8) ही दोन मुले असून पत्नी सुषमा नागपूर येथे कुटुंबासमवेत राहत आहेत. आई जिजाबाई (वय 78) वर्ष मलकापूर येथे वास्तव्यास आहे. संजयला चार भाऊ व एक बहीण असून मोठा राजेश दीक्षित शेगाव येथे राहत असून संग्रामपूरला तलाठी पदावर कार्यरत आहे. दुसरा संजोग शारीरिक अपंग असून खाजगी कामावर मलकापूर येथे आईजवळ राहतो. लहान भाऊ विक्रम याचा जुलै 2013 मध्ये मोटरसायकल अपघातात अंत झालेला असल्याने या परिवारावर दुःखाचा डोंगर असतानाच दुसऱ्या मुलालाही वीरमरण प्राप्त झाल्याने म्हाताऱ्या आईवर सध्या डोंगर कोसळला आहे.

10 फेब्रुवारीला संजय राजपूत मलकापूरवरून आईची व मित्रांची भेट घेऊन नागपूरमार्गे 4-5 दिवसाच्या सुट्या संपवून जम्मूकडे रवाना झाला होता. त्यांची ही शेवटचीच भेट ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com