सारथीचे संकेतस्थळ बंद; शेकडो विद्यार्थ्यांना फटका

शुभम बायस्कार
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थाच्या (सारथी) वतीने विविध प्रकारच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

अकोला : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थाच्या (सारथी) वतीने विविध प्रकारच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईनद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ‘सारथी’चे संकेतस्थळ तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. 

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मध्ये 11 महिन्यांसाठी मानधन तत्त्वावर मनुष्य बळाची गरज आहे. वरिष्ठ स्वीय सहाय्यक, स्वीय सहाय्यक, लघुलेखक (मराठी उच्चश्रेणी), लघुलेखक (मराठी निम्न श्रेणी) लघुलेखक (इंग्रजी, उच्चश्रेणी), लघुलेखक (उंग्रजी, निम्नश्रेणी), लघुटंकलेख, सहाय्यक प्रकल्प संचालक प्रसिद्धी, सहाय्यक प्रकल्प संचालक (प्रकाशन), प्रकल्प अधिकारी (प्रसिद्धी), ग्रंथपाल, भांडारपाल, सहायक ग्रंथपाल, चल छायाचित्रकार, अभिलेखपाल, वीजतंत्री, मुकादम, नाईक, झेरॉक्स मशीन चालक, माळी या पदांचा यामध्ये समावेश आहे. 

या सर्व पदांसाठी सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक हा जवळ येत असतानाही सारथीचे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही उमेदवारांनी यासंदर्भातील कैफियत सारथीकडे मेलद्वारे मांडली. पण त्याला सारथीकडून प्रतिसाद दिला जात नसल्याचे परीक्षार्थी उमेदवारांचे म्हणणे आहे. 

मुदत वाढविण्याची मागणी 

सारथी संस्थेत काम करण्यास इच्छुक असणारे उमेदवार वारंवार संकेतस्थळ पाहत आहे. मात्र, त्यांना संकेतस्थळ बंद असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याच्या काळात संकेतस्थळ बंद असल्याने संकेतस्थळ तातडीने सुरु करावे. तसेच अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.

देशात मोठ्या प्रमाणात सध्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून मानधन तत्वावर जागा काढल्या जात आहे, त्यामध्ये अशा समस्या निर्माण करून ठेवण्यात येत आहे. सारथीचे संकेतस्थळ हे मागील काही दिवसांपासून बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. सदर प्रक्रियेमध्ये अर्थपूण व्यवहार तर होत नाही ना असा संथय बळावल्या जात आहे.

- अविनाश चव्हाण, विद्यार्थी संघटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarathi Website Stopped due to Technical Error