सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द

सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द
नागपूर : माजी मंत्री व शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन कॉंग्रेसने रद्द केले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदींच्या समर्थकांनी शाई फेकली होती. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी अलीकडेच शिवसेनेत दाखल झाले आहेत.
चतुर्वेदी आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे संबंध विकोपाला गेले होते. महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने चतुर्वेदी नाराज झाले होते. त्यावरून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याही सोबत त्यांचा वाद झाला होता. चतुर्वेदी, नितीन राऊत एकीकडे तर मुत्तेमवार आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे दुसरीकडे असे दोन गट पडले होते. आजही दोन्ही गटामध्ये दुफळी कायम आहे. अशोक चव्हाण मुत्तेमवार गटाला झुकते माप देत असल्याने चतुर्वेदी नाराज होते. त्यामुळे आपल्या समर्थकांना हाताशी घेऊन त्यांनी समांतर मेळावे, कार्यक्रम घेणे सुरू केले होते. एकाच शहरात व एकाच वेळी कॉंग्रेसचे दोन कार्यक्रम घेतल्या जात होते. शेवटी याची तक्रार अशोक चव्हाण यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली. त्यावरून चतुर्वेदी यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. अनेक नेत्यांच्या माध्यमातून चतुर्वेदी यांनी निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न केले. काही नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशोक चव्हाण यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळे कोणाचेच काही चालले नाही. चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदावरून जाताच चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याचे पत्र सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी प्रसिद्ध केले केले आहे. त्याची एक प्रत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना आवर्जुन पाठवण्यात आली आहे. मुत्तेमवार गटाला हा जबर धक्का मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com