सतीशचे डोळस यश; दिव्यांगांच्या श्रेणीत अव्वल स्थान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

"सनदी अधिकारी बनायचे' 
शैक्षणिक भत्त्यातूनच सतीशने आपल्या शालेय साहित्यासारख्या गरजा भागविल्या. दररोज महाविद्यालयात जाऊन वर्गाला हजेरी लावत होता. वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास करायचा. ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून त्याने अभ्यास केला.

नागपूर - अपंगत्वावर मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या इयत्ता बारावीच्या कला शाखेत शिक्षण घेणाऱ्या सतीश उके या विद्यार्थ्याने बारावीमध्ये 78 टक्के गुण प्राप्त करून दिव्यांगांच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकाविले आहे. 

मूळचा भंडारा जिल्ह्यातील चिचगाव येथील रहिवासी असलेला सतीश उके हा नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच सतीशच्या डोक्‍यावरून वडिलांचे छत्र हरविले. तीन लेकरांचा सांभाळ करण्यासोबतच कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आई अंगणवाडीसेविका म्हणून काम करू लागली. मुलगा मोठा होऊन कुटुंबाचा आधार होईल, अशी भाबडी अपेक्षा आईची होती. पण सतीश चवथ्या वर्गात असताना मोबाईलसोबत खेळता खेळता अचानक स्फोट झाला आणि त्याला अंधत्व आले. यातच सामान्य सतीश हा दिव्यांग झाला. सामान्य शाळेत जाणाऱ्या सतीशला नियतीने दिव्यांगांच्या शाळेत पाठविले. त्यातच वयाच्या 10 व्या वर्षीच सतीश आईपासून दूर झाला. त्याने नागपुरातील अंध विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढच्या शिक्षणासाठी त्याने दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याला गड्डीगोदाम परिसरातील चोखामेळा वसतिगृहात निवारा मिळाला. समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शैक्षणिक भत्त्यात तो आपल्या दैनिक गरजा भागवीत होता. दिव्यांग असतानादेखील त्याने आपल्या आईला कधीच कुठल्या गोष्टीसाठी अथवा कशासाठी त्रास दिला नाही. 

"सनदी अधिकारी बनायचे' 
शैक्षणिक भत्त्यातूनच सतीशने आपल्या शालेय साहित्यासारख्या गरजा भागविल्या. दररोज महाविद्यालयात जाऊन वर्गाला हजेरी लावत होता. वेळ मिळेल तेव्हा तो अभ्यास करायचा. ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून त्याने अभ्यास केला. पुढे शिक्षण घेऊन त्याला लवकरात लवकर कुटुंबाचा आधार बनायचा आहे. त्यातूनच त्याने सनदी अधिकारी बनायचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सतीशला अपंगत्वाचा सामना करतानाच, परिस्थितीवरही मात करावी लागली हे विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satish Uke success in HSC