प्रवेशावेळी वयात शिथिलता देण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना

शशिकांत जामगडे
बुधवार, 31 जुलै 2019

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : शाळा प्रवेशाच्या वेळी बालकाचे किमान वय शासनाने ठरवून दिल्यानंतर आता बालकाच्या प्रवेशाच्या वयामध्ये शिथिलता देण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे.

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : शाळा प्रवेशाच्या वेळी बालकाचे किमान वय शासनाने ठरवून दिल्यानंतर आता बालकाच्या प्रवेशाच्या वयामध्ये शिथिलता देण्याचा अधिकार संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 30 सप्टेंबर रोजी प्लेग्रुप व नर्सरीसाठी तीन वर्षे पूर्ण आणि पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असावे, असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन निर्णय 21 जानेवारी 2015, 23 जानेवारी 2015 व 25 जानेवारी 2017 नुसार निश्‍चित केले होते. बालकाच्या किमान वयात शिथिलता आणण्याबाबत शासनाकडे अनेक निवेदने प्राप्त होत असल्याने त्याला अनुसरून शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयात शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आता 30 सप्टेंबरला शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय तीन वर्षे/सहा वर्षे पूर्ण होत नसल्यास किमान वयामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. प्लेग्रुप व पहिलीत प्रवेश घेणाऱ्या बालकास 15 ऑक्‍टोबरपर्यंत तीन वर्षे आणि सहा वर्षे पूर्ण होत असल्यास अशा बालकांना प्रवेश द्यावा, असे आदेश 25 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी दिले आहेत.

किमान वय पूर्ण होत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक बालके अंगणवाडीत वा शाळेत जात नव्हते. अनेक विद्यार्थ्यांना वर्षभर प्रवेशापासून वंचित राहण्याबरोबरच घरीच राहावे लागे. शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बालकांना शिक्षणाचा हक्क मिळण्याबरोबरच शाळांच्या पटसंख्येत वाढ होऊ शकते.
- मनोज रामधनी, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, यवतमाळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school admission relaxsation