अवघ्या दोन दिवसांनी वाजणार शाळेतील घंटा, कोरोनापूर्वी अन् कोरोनाकाळातील शाळेत काय असणार फरक?

school arrangement in corona time at chandrapur
school arrangement in corona time at chandrapur

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना लागलेले कुलूप आता उघडले जाणार आहे. 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग, वसतिगृहे व आश्रमशाळा सुरू करण्यात येणार आहे. टप्पेनिहाय लॉकडाउन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी मिशन बिगीन अगेनअंतर्गत शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश प्राप्त झाले आहेत. या निर्देशांच्या अधीन राहून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेल्या शाळा व महाविद्यालयातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग, वसतिगृहे व आश्रमशाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी परवानगी दिली आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्‍सीमीटर, हात धुण्यासाठी साबण व पाणी आदींची सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दररोज करणे आवश्‍यक राहील. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 17 ते 22 नोव्हेंबर 2020 या दरम्यान कोविड-19  साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्‍टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे.

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी ऑनलाइन गृहपाठाची व्यवस्था करावी. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी 50 टक्‍के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित 50 टक्‍के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी या प्रकारे एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवावे. प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक असू नये. शाळेत जेवणाची सुटी नसेल.

वर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी. शाळा वाहतुकीच्या वाहनाचे दिवसातून किमान दोनवेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी शाळेत वावरताना त्यांनी किमान 6 फुट अंतराचे पालन करावे. विविध इयत्तांचे वर्ग सुरू होण्याच्या व संपण्याच्या वेळामध्ये किमान 10 मिनिटांचे अंतर असावे. शाळेच्या परिसरात चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, ही मुख्यध्यापकांची जबाबदारी असेल. शाळेत प्रात्यक्षिक कार्ये घेताना विद्यार्थ्यांचे लहान लहान गट करून घेण्यात यावेत म्हणजे शारीरिक अंतराचे पालन करणे सुलभ होईल.

शाळांनी शालेय शिक्षण विभागाच्या 10 नोव्हेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालक करावे. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायदा व भारतीय दंडसंहिता 1860 मधील नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदेशात नमूद केले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com