गडचिरोली जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर: इंग्रज मिशनरी शाळेची अवस्था दयनीय

School from British era are in bad condition in Gadchiroli
School from British era are in bad condition in Gadchiroli

सिरोंचा (जि. गडचिरोली)  : ब्रिटिशांच्या काळात जिल्ह्याचा दर्जा असलेल्या सिरोंचा तालुक्‍याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, या वारशाचे जतन होताना दिसत नाही. येथे ब्रिटीशकाळात मिशनरींनी बांधलेली शाळा अशीच दुर्लक्षित असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

तालुक्‍यातील पूर्वीचा इतिहास बघितला असता हा संपूर्ण परिसर अविकसित व घनदाट जंगल असलेला हा तालुका नव्हे, तर ब्रिटिशकाळात जिल्हा होता. येथून छत्तीसगड व आंध्र प्रदेश तसेच कामानिमित्त चंद्रपूर जायचे म्हटले, तर बैलगाडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. लांबच्या प्रवासाला निघाले की सोबत मशाल व शिदोरी घेऊन घनदाट जंगलातून वाट काढत प्रवास करावा लागत होता. त्या काळात जंगलातील हिंस्र श्‍वापदांची फार मोठी दहशत होती. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे. 

अशातच इंग्रजांनी भारतात सत्ता स्थापन केल्यावर मिशनरीज हैदराबाद येथून सिरोंचा शहरात दाखल झाले. आताच्या स्थानिक शिवाजी चौकात 60 एकर क्षेत्रावर त्यांनी आपले बिऱ्हाड मांडले. या जागेवर इंग्रज मिशनरीजनी हैदराबाद येथील संस्थानच्या मदतीने या ठिकाणी फ्रांसिस सी. डेव्हिड स्कूल या नावाने 1619 मध्ये मुलामुलींकरिता शैक्षणिक संस्था स्थापन केली. त्या काळात शिक्षणाचा गंध मुलांना कळत नसताना त्यांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक जागरूकता निर्माण करण्यासाठी धावपळ सुरू  ठेवली. त्यांना यात यशही प्राप्त झाले. 

शिक्षणाचे महत्त्व कळले तेव्हा छत्तीसगड, आंध्र प्रदेश (आताचा तेलंगणा), महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांतील पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी या ठिकाणी पाठविण्यास सुरुवात केली. त्या काळात दळणवळणाची योग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बैलगाडी घेऊन प्रवास करीत विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दखल झाले. या 60 एकर जमिनीवर मिशनरीजनी हैदराबाद येथील संस्थानाच्या मदतीने मुलांकरिता मोफत शिक्षण घेण्यासाठी व्यवस्था केली. पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यासाठी व्यवस्था केली. राहण्यासाठी वसतिगृहाचे बांधकाम केले. 

शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासह राहणे तसेच जेवणाची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याच्या योजनेकरिता परिसरात विहीर बांधण्यात आली. परिसरात मुलांकरिता बगीचा तयार करण्यात आला. तसेच मनोरंजनाचे साहित्यही निर्माण करण्यात आले. बाहेरून आलेल्यांकरिता निवास, रुग्णांकरिता दवाखानाही सुरू  करण्यात आला. या अतिशय घनदाट परिसरात वन्यजीवांची दहशत असतानाही या ठिकाणी 250 च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळेचे नामकरण फ्रिबेल रिसीव्ही फ्रिली गिव्ह असे नाव देण्यात आले. 1979 पर्यंत या शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जात होते. 

सध्या या शाळेत शिक्षण घेतलेल्या काही व्यक्ती आता हयात नाहीत. त्यावेळी हैदराबाद मेडीसिस संस्थेच्या मिस लाईनर या शाळेचा कारभार बघत. हेडमास्तर म्हणून ईजरीयाल होते.  ईजरीयाल हे विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित हे विषय शिकवत होते. या शाळेत कार्यरत शिक्षक शेख हे इतिहास, भूगोल हा विषय शिकवत. 1979 नंतर शाळेचा निकाल योग्य येत नसल्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्णपणे बंद करून हिंदी भाषेत शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली. 

लागली उतरती कळा

सध्या शाळेला उतरती कळा लागली असून आता सातवीपर्यंतच शिक्षण दिले जाते. शाळेची पटसंख्या रोडावली असून शाळेत फक्त 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शाळेचा कारभार मुख्याध्यापिका रूपराणी अरेडकर बघत असून त्यांच्या मदतीला एकच शिक्षिका या शाळेत कार्यरत आहे. एकेकाळी नावाजलेली ही शाळा आता योग्य मदत मिळत नसल्याने शेवटच्या घटका मोजत आहे.

मदतीची अपेक्षा

या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी दहावीनंतर कोणी नेता, डॉक्‍टर, वकील, वैमानिक, वैज्ञानिक, शिक्षक झाले. मात्र, कुणीही पुन्हा फिरकून आपल्या या शाळेकडे पाहिले नाही. सिरोंचातील शिक्षणाची धुरा अनेक वर्ष वाहणाऱ्या या शाळेकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष झाले. म्हणून तिला अशी अवकळा प्राप्त झाली आहे. मात्र, समाजातील दानशूर व्यक्ती, सुज्ञ  नागरिक, माजी विद्यार्थी मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com