शाळेच्या जलकुंभात आढळली दारूची बाटली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

भंडारा : तुमसर तालुक्‍यातील सुकळी (देव्हाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील जलकुंभात दारूची बाटली टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिस व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

भंडारा : तुमसर तालुक्‍यातील सुकळी (देव्हाडी) येथील जिल्हा परिषद शाळेतील जलकुंभात दारूची बाटली टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिस व गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
सुकळी येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलकुंभ बांधले आहे. विद्यार्थी या जलकुंभाचे पाणी पितात. जलकुंभाला कुलूप लावले जात नव्हते. दोन दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्याला उग्र वास येत असल्याचे सांगितले. शिक्षकांनी तपासले असता पाण्याला दारूचा वास येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांना कळविले. त्यांनी पाहणी करून पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता जलकुंभात दारूची बाटली आढळून आली. शाळेच्या आवारातच कोणीतरी मद्यपान करीत असावे. मात्र, चाहूल लागल्याने लपविण्यासाठी जलकुंभातच ग्लास व बाटली टाकली असावी, अशी चर्चा आहे. एखाद्या माथेफिरूने जाणीवपूर्वक हे कृत्य केले काय, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे शक्‍य नाही. विद्येचे मंदिर असलेल्या शाळा परिसरात उघडकीस आलेला हा प्रकार निंदनीय आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आपण शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांशी चर्चा करून शाळा सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात येईल.
- धनेंद्र तुरकर, अर्थ व शिक्षण सभापती, भंडारा.

Web Title: school news