सांगा विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणायचे?

मंगेश गोमासे 
सोमवार, 22 एप्रिल 2019

पायाभूत चाचणीत दिसावी प्रगती
राज्यातील शाळांमध्ये जुलै महिन्यात पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के प्रगती व्हावी या उद्देशानेच आयुक्तांकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये शंभर टक्के उपस्थिती व शंभर टक्के गुणवत्ता हे उद्दिष्ट शिक्षकांना दिले आहे.

नागपूर - जिल्हा परिषदेतील शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ११ एप्रिलपूर्वीच संपल्या. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी शाळेत येणे बंद केले. मात्र, १८ एप्रिलला आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी अभ्यासात दुबळे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून अधिकृत सुट्याच्या घोषणेपर्यंत शिकवा, असे आदेश दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत  आणायचे कसे, या प्रश्‍नाने शिक्षकांच्या जिवाला घोर लागला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची तपासणी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी ‘असर’च्या धर्तीवर चाचणी घेण्याचे ठरविले. यानंतर त्यांनी ‘सीआरजी’ ग्रुपच्या माध्यमातून चाचणीही घेतली. या चाचणीत प्रत्येक केंद्र व शाळेतील काही विद्यार्थी किमान अध्ययन क्षमता प्राप्त करू शकले नसल्याची बाब समोर आली. या विद्यार्थ्यांची माहिती केंद्र आणि शाळांना पाठविण्यात आली. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी या विद्यार्थ्यांची किमान अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी शाळेत बोलावून रोज पूरक मार्गदर्शन करीत शंभर टक्के प्रगत करण्याचे आदेश दिले आहे.

शाळा अधिकृत १० मेपर्यंत सुरू असल्या तरी परीक्षा संपल्यावर सुट्या लागल्याचे विद्यार्थी समजतात आणि शाळेत येणे बंद करतात. अनेक विद्यार्थी बाहेरगावीही जातात. केवळ निकाल घेण्यासाठीच शाळेत येतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्या असून, ते सुट्यांच्या ‘मोड’मध्ये गेले आहेत. शिक्षकांकडून त्यांना वारंवार बोलाविण्यात येते. परंतु, विद्यार्थी शाळेतच येत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेकडून शालेय पोषण आहारही बंद केला आहे. त्यामुळे किमान त्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही शाळेकडे पाठ फिरविली आहे. अशावेळी एक दोन विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडून औपचारिकता पार पाडण्यात येत असल्याचे समजते. मात्र, काही शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याने गुरुजींच्या चिंतेत भर पडली आहे.

आज आयुक्तांची बैठक
शाळांमध्ये अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांना बोलावून शंभर टक्के प्रगत करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर आहे. त्यासंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी (ता. २२) आर.  एस. मुंडले शाळेच्या सभागृहात बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत शिक्षकांना  आयुक्तांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: School Teacher Student