रद्दी खाणार ‘भाव’!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नागपूर - ‘रद्दीच्या भावातही विकला जाणार नाही’ असे म्हणून आपण एखाद्या वस्तूला आणि पर्यायाने रद्दीलाही हिनवण्याची संधी कधीच सोडली नाही. पण, याच रद्दीला चांगले दिवस आले आहेत. रद्दीचा भाव किती वाढेल याबाबत अनिश्‍चितता असली तरी प्लॅस्टिक बंदीमुळे हीच रद्दी येत्या काळात ‘भाव’ नक्कीच खाणार, असे चित्र तयार झाले आहे.

नागपूर - ‘रद्दीच्या भावातही विकला जाणार नाही’ असे म्हणून आपण एखाद्या वस्तूला आणि पर्यायाने रद्दीलाही हिनवण्याची संधी कधीच सोडली नाही. पण, याच रद्दीला चांगले दिवस आले आहेत. रद्दीचा भाव किती वाढेल याबाबत अनिश्‍चितता असली तरी प्लॅस्टिक बंदीमुळे हीच रद्दी येत्या काळात ‘भाव’ नक्कीच खाणार, असे चित्र तयार झाले आहे.

जुनी वर्तमानपत्रे, पुस्तके, वह्या आदींना रद्दीच्या व्यावसायिकाकडे एक विशिष्ट भाव आहे.  पुस्तके आणि वह्यांचा फारसा व्यवसाय नसला तरी जुन्या वर्तमानपत्रांचे भाव मात्र सतत कमी-जास्त होत असतात. किराणा दुकानदारांना विकण्यापासून तिला पुनर्प्रक्रियेसाठी  पाठविण्यापर्यंत या रद्दीचा विविध पद्धतीने वापर होतो. पण, त्यासंदर्भात मार्केट तर नव्हतेच शिवाय पाहिजे तशी जनजागृतीही नव्हती. आजवर प्लॅस्टिक बंदीचे फतवे अनेकवेळा निघाले पण प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही त्यामुळेच ही परिस्थिती होती. आता मात्र रद्दीचे भाव येत्या  महिन्याभरात तीन ते चार रुपयांनी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. रद्दीचा व्यवसाय करणारे मारोती कोडे यांनी रद्दीला सुगीचे दिवस येईल, असा अंदाज ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. नागपूर शहरात रद्दीच्या खरेदी-विक्रीची दर महिन्याला जवळपास ४५ कोटी एवढी उलाढाल होत असल्याचेही मारोती कोडे यांनी सांगितले. ‘रद्दीचे भाव दर महिन्याला कमी-जास्त होतात. बरेचदा शहरातील प्रत्येक भागातील रद्दीचे भावही वेगवेगळे असल्याचे तुम्हाला दिसेल. मागणीनुसार ही परिस्थिती निर्माण होत असते. प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे येत्या काळात रद्दीचे भाव थोड्याफार फरकाने का होईना सतत वाढत राहण्याची शक्‍यता आहे,’ असेही ते म्हणाले.

‘पेपर बॅग’चा उद्योग 
जुन्या वर्तमानपत्रांचा वापर करून पेपर बॅग्स तयार करण्याचा मोठा व्यवसाय अस्तित्वात आहे. पण, त्याचे क्षेत्र सध्या मर्यादित आहे. प्लॅस्टिकबंदीमुळे पेपर बॅग्सची मोठी इंडस्ट्री नागपुरात उदयास येण्याची मोठी शक्‍यता आहे. आतापर्यंत हीच रद्दी रिसायकलिंगसाठी पाठविली जात होती. आता यात पेपर बॅग्सच्या वापराची टक्केवारी वाढणार आहे. विशेष म्हणजे यातून ‘स्टार्ट अप’चा मार्गही तरुणांना सापडू शकतो. बाहेरून कागदाच्या दिसणाऱ्या या बॅग्समध्ये आतून सिल्व्हर पेपर वापरल्यास त्याचा पिशवीसारखा वापरही होऊ शकतो.

रद्दीचे भाव
गेल्या महिन्यात १३ रुपये प्रतिकिलो
सध्या ११.३० रुपये प्रतिकिलो
पुढील काळात १५ ते १६ रुपये प्रतिकिलो

Web Title: scrap rate increase