ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा सुरळीत; पण ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना?

Second Term of Gam panchayat elections in Gadchiroli
Second Term of Gam panchayat elections in Gadchiroli

गडचिरोली : एकेकाळी ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवणाऱ्या, त्यातील राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या नक्षलवाद्यांनी यंदा प्रथमच अलिप्ततेची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवार (ता. 15) पहिल्या टप्प्यातील मतदान 82.18 टक्‍के, असे भरघोस झाले. त्यामुळे नक्षलवादी खरच शांत झाले की ही वादळापूर्वीची शांतता आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शिरकावच अतिदुर्गम ग्रामीण भागांतून झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील एकूणच व्यवस्थेवर ते आपले वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पूर्वी नक्षलवादी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे नागरिकांना आवाहन करायचे, निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी हिंसक कारवाया करायचे. काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी निवडणुकीला उभ्या राहणाऱ्यांनाच जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या होत्या. 

विशेषत: सरपंचपदासाठीच्या उमेदवारांना. त्यामुळे दुर्गम भागांतील कित्येक ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी कुणीच पुढे येत नव्हते. पण, यंदा ग्रामपंचायत निवडणूक रंगात आली असतानाही नक्षलवाद्यांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाही. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतींचे मतदान शुक्रवारी निर्विघ्न पार पडले. विशेष म्हणजे कोरची, कुरखेडा, धानोरासारख्या नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागांतही नक्षल्यांच्या काहीच हालचाली दिसल्या नाही. त्यामुळे गावपातळीवरील हा लोकशाहीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा झाला. 

शुक्रवारी सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या सहा तालुक्‍यांतील 499 मतदान केंद्रांवर व 10 सहाय्यकारी मतदान केंद्रांवर असे मिळून 509 मतदान केंद्रावर प्रक्रिया पडली. आता बुधवार (ता. 20) चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड या उर्वरित सहा तालुक्‍यांत मतदान आहे. यातील एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा हे तालुके अधिकच संवेदनशील आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात नक्षल कारवायांची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासनही दक्ष असून तगडा बंदोबस्त राहणार आहे.

सावध पवित्रा...

मागील काही वर्षांत पोलिस विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाया करत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ही चळवळ काहीशी दुबळी झाल्याचे दिसून येत आहे. पण, नक्षलवादी अद्याप संपलेले नाहीत. ते कोणत्या ना कोणत्या घटनेतून आपले अस्तित्व दाखवण्याची शक्‍यता आहे. सध्या त्यांची शक्ती कमी झाल्याने या निवडणुकीत शांत राहण्याचा पवित्रा त्यांनी घेतला असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com