
घुग्घूस येथील एसीसी सिमेंट कंपनीमध्येही पाच ते सहा आरोपींनी भंगार चोरण्याचा प्रयत्न २० जानेवारीला केला होता. यावेळी सुरक्षा रक्षक श्यामसुंदर प्रजापती यांनी भंगार चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरक्षा रक्षकाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
घुग्घूस (जि. चंद्रपूर) : एसीसी सिमेंट कंपनीच्या सिंदोला माईन्स येथील अमोनिया स्टोरेज टॉवरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मारहाण करून त्यांच्याकडून डबल १२ बोर रायफल आणि १० राउंड जिवंत काडतुसे पळविणाऱ्या पाच आरोपींना रविवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रायफल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
आरोपींमध्ये प्रशांत उर्फ पशी राजेंद्र मालवेणी (२४), कार्तिक उर्फ नानी दुर्गेश कोडापे (२०), श्रीकांत उर्फ चिट्टी भीमय्या सोप्परी (२६), बबलू पिंगली, विजय उर्फ अंडया भास्कर त्याने (२४) यांचा समावेश आहे. श्रीकांत उर्फ चिट्टी भीमय्या सोप्परी याच्याकडून बारा बोर रायफल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
अधिक वाचा - गडकरींशी पंगा नको म्हणून आमदार पडळकरांना भाजप नेत्यांनी सोडले वाऱ्यावर; अद्याप ‘वंचितच'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारीला सायंकाळी सात वाचताच्या सुमारास एसीसी सिमेंट कंपनीच्या सिंदोला माईन्सच्या अमोनिया स्टोरेज टॉवरवर (एस.आई.एस.) सुरक्षा कंपनीचे गैंगमन रामजी जग्गी सिंग तर खाली इरफान सिकंदर शहा आदी तैनात होते.
तोंडावर मुखवटा परिधान केलेले तीन अज्ञान व्यक्तींनी दोन्ही सुरक्षा रक्षकांना मारहाण करून सुरक्षा रक्षक इरफान सिकंदर शहा यांच्याकडील १२ बोर रायफल आणि दुहेरी बॅरेलचे १० जिवंत काडतुसे हिसकावून मोटार सायकलने पळ काढला होता. त्यांच्यावर वणी तालुक्यातील सिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तेव्हापासून रायफल आणि काडतूस घेऊन आरोपी फरार होते.
याचप्रमाणे घुग्घूस येथील एसीसी सिमेंट कंपनीमध्येही पाच ते सहा आरोपींनी भंगार चोरण्याचा प्रयत्न २० जानेवारीला केला होता. यावेळी सुरक्षा रक्षक श्यामसुंदर प्रजापती यांनी भंगार चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुरक्षा रक्षकाला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. जखमी सुरक्षा रक्षक तेव्हापासून रुग्णालयात उपचार करीत होते.
सदर घटनेची तक्रार २९ जानेवारीला घुग्घूस पोलिस ठाण्यात दाखल केली. डी. बी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पाच सशंयीताना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी घुग्घूस एसीसी सिमेंट कंपनीतील सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे कबुल केले. तसेच सिंदोला माईन्समधील सुरक्षा रक्षकाकडून रायफल आणि काडतूस पळविल्याची कबुली दिली. दोन्ही घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.