सेमिस्टर पॅटर्न बंद करणे अशक्‍य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

कशी सुधारेल रॅंकिंग : कुलगुरू 
राज्यातील विद्यापीठांमधील बरीच प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शिवाय बरेच प्राध्यापक व संशोधक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे संशोधन आणि पेंटटची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याचाच फटका रॅंकिंगमध्ये बसल्याचे दिसून येते. याबाबत कुलगुरूंनी रोष व्यक्‍त केला. त्यावर शिक्षण विभागाने कुठलेही उत्तर दिले नसल्याचे समजते. याउलट महाविद्यालयांच्या ऑटोनॉमीवर अधिक भर देण्याचे सांगितले. यावेळी जेबीव्हीसीमध्ये नवीन विद्यापीठ कायदा आणि विद्यापीठाला बसणाऱ्या आयकराविषयी चर्चा करण्यात आली.

नागपूर - विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्वच विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमात सेमिस्टर पॅटर्न लावण्यात आला. हा पॅटर्न विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना मारक ठरत असल्याचा आरोप होत आहे. कुलगुरूंच्या संयुक्त परिषदेत (जेबीव्हीसी) या मुद्द्यांवर झालेल्या चर्चेत कुलगुरूंचा प्रस्ताव राज्य शासनाकडून धुडकावण्यात आला. यावेळी विद्यापीठांनी महाविद्यालयस्तरावरच परीक्षा घेण्याचा सल्ला शासनाकडून देण्यात आला.  

विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासह पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये सेमिस्टर पद्धती लागू केली आहे. यामुळे विद्यापीठासमोर वर्षभर परीक्षा घेण्याचे आव्हान असते. शिवाय महाविद्यालयांमध्येही अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे लक्ष्य असते. मुळात सेमिस्टर पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांना क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राकडे लक्ष देता येणे अशक्‍य होते. शिवाय महाविद्यालयांनाही त्यांच्यात गुंतावे लागते. सिनेटच्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर बरीच चर्चा झाली. त्यात सेमिस्टर पॅटर्न बंद करण्यासाठी विद्यापीठाने ठराव करण्याचे सांगण्यात आले. मात्र, कुलगुरूंनी हा विषय  कुलगुरूंच्या संयुक्त परिषदेत मांडण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर ७ एप्रिलला मुंबईत झालेल्या कुलगुरूंच्या संयुक्त परिषदेत हा विषय चर्चेला आला. मात्र, शासनाकडून अनुदान आयोग आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सेमिस्टर पॅटर्न न राबविणाऱ्या विद्यापीठांचे अनुदान बंद करण्याचे पत्र आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनुदानासाठी विद्यापीठांनी सेमिस्टर पॅटर्न सुरूच ठेवावा, असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाकडूनच परीक्षांचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही शासनाकडून कुलगुरूंना देण्यात आला.

Web Title: semester pattern close nagpur university