झोपडपट्टीधारकांना पट्ट्यांसाठी निधीसाठी प्रस्ताव पाठवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

झोपडपट्टीधारकांना पट्ट्यांसाठी निधीसाठी प्रस्ताव पाठवा
नागपूर : शहरातील झोपडपट्टीवासीयांना जागेचे पट्टे देण्यासंदर्भातील प्रक्रियेस गती द्या. आवश्‍यक निधीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टीधारकांना पट्ट्यांसाठी निधीसाठी प्रस्ताव पाठवा
नागपूर : शहरातील झोपडपट्टीवासीयांना जागेचे पट्टे देण्यासंदर्भातील प्रक्रियेस गती द्या. आवश्‍यक निधीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एनएमआरडीए) बैठक सोमवारी मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत पार पडली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार उपस्थित होत्या. बैठकीत एनएमआरडीए क्षेत्रात गुंठेवारीत न येणाऱ्या 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या अनधिकृत भूखंडांना नियमिती करण्यासाठी नियम तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एनएमआरडीए व म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांची निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पालकमंत्री बावनकुळे यांनी ग्रोथ सेंटरमधील बांधकामांना नियमानुकूल करून त्यावरील शुल्क माफक दरात आकारण्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. बैठकीत एनएमआरडीए क्षेत्रांतर्गत जलवाहिन्या, मलवाहिका प्रकल्पासाठी आराखडा तयार करणे तसेच सल्लागाराची नियुक्ती करणे, जमीन उपयोगाचे धोरण निश्‍चित करणे, प्राधिकरणाचे वित्तीय प्रारूपास तत्त्वतः मान्यता देऊन हा विषय कार्यकारी समितीकडे पाठविणे, सुधारित आकृतिबंधास मंजुरी देणे, प्राधिकरणाच्या क्षेत्रातील विकास योजनेतील रहिवासी भागात पायाभूत सुविधांसाठी रक्कम आकारणे आदी विविध विषयांना मंजुरी दिली.
आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधीर पारवे, अनिल सोले, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, एनएमआरडीएचे आयुक्त व जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल, पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा आदी उपस्थित होते.

Web Title: Send fund proposal for slum dweller