वरिष्ठ माओवाद्यांची मुले मोठ्या पदांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

गडचिरोली - क्रांतीच्या नावावर रक्तपात करून दहशत पसरविणाऱ्या नक्षलवाद्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. खंडणीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून मुलांना चांगले शिक्षण देत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात नक्षलविरोधी अभियानाच्या माहिती व जनसंपर्क कक्षाने माहिती प्रसिद्ध केली होती. 

गडचिरोली - क्रांतीच्या नावावर रक्तपात करून दहशत पसरविणाऱ्या नक्षलवाद्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. खंडणीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून मुलांना चांगले शिक्षण देत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात नक्षलविरोधी अभियानाच्या माहिती व जनसंपर्क कक्षाने माहिती प्रसिद्ध केली होती. 

ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या हिंसक चळवळीत सामील करून घेण्यासाठी माओवादी साहित्याचे वाटप करणारा देवकुमार सिंह ऊर्फ अरविंद निशांत ऊर्फ सुजित याचा मुलगा कानपूर आयआयटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. चळवळीत कंपनी कमांडर राहिलेल्या मल्लराजी रेड्डी ऊर्फ सतेन्ना ऊर्फ सयन्ना ऊर्फ सागर ऊर्फ आलोक ऊर्फ देशपांडे ऊर्फ एसएएन ऊर्फ लक्ष्मणची मुलगी स्नेहलता विज्ञान शाखेची पदवी (बीएस्सी) पूर्ण करून आता कायद्याचे (एलएलबी) शिक्षण घेत आहे.

विजय रेड्डी ऊर्फ सुगुलरी चिन्नान्ना ऊर्फ नागन्नाचा मोठा मुलगा बी.टेक.ची पदवी घेऊन तेलंगणा येथील बहुराष्ट्रीय कंपनीत लाखो रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करीत आहे. तर, त्याचा लहान मुलगा प्रताप याने बी.टेक.ची पदवी पूर्ण केली आहे. कंपनी कमांडर के. के. मुरलीधरन ऊर्फ राजेंद्र ऊर्फ गोपी ऊर्फ राघव ऊर्फ विजयन्ना ऊर्फ सन्नीचा मुलगा नचिकेतन केरळ राज्यातील कोच्ची येथे सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करीत आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता राहिलेला व नंतर शरणागती पत्करलेल्या राजेंद्र रेड्डी ऊर्फ कट्टारामचंद्र ऊर्फ राजू दादा ऊर्फ गुडसा उसेंडीची मुलगी स्नेहा ऊर्फ डॉली बी.टेक.ची पदवी घेऊन आयटी कंपनीत ५ लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी करीत आहे. तर, त्याचा मुलगा दंतशास्त्र (डेंटल)च्या अभ्यासक्रमाला आहे. नक्षल चळवळीतील डिव्हिजनचा सदस्य असलेल्या मारचेला यासबू ऊर्फ श्रीमन नारायण कैलाशमची मुलगी अंगणवाडी चालविण्याचे काम करीत आहे. तर, पोलिट ब्यूरो सदस्य मिशीर स्वतःच्या मुलामुलींना चांगल्या शाळेत शिक्षण देत आहे. गडचिरोली पोलिस प्रशासनानेही माओवाद्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अनेकदा मदत केली आहे.

नर्मदाक्का, जोगन्नाचे सहकार्य
काही वरिष्ठ नक्षल्यांनी गोरगरीब व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतही केल्याची माहिती पुढे आली आहे. नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेते नर्मदाक्का व जोगन्ना यांनी मदत केलेले अनेक जण आज वेगवेगळ्या विभागांत नोकरीवर आहेत. काही नक्षल्यांनी स्वतःच्या मुलांना मोठे केले; तर नर्मदाक्का व जोगन्ना यांनी समाजातील इतरांना मदत करून शिक्षणासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे या दोघांची नावे आदराने घेतली जातात.

Web Title: Senior Maoists children in big positions