सिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

नागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सिरियल किलरच्या दोन गुंडांना न्यायालय परिसरातून अटक करण्यात आली. राजेश झिठूलाल मेश्राम (32, रा. बहादुरा फाटा) व कपिल ईश्‍वर मस्करे (23, रा. डिप्टी सिग्नल) अशी अटकेतील गुंडांची नावे आहेत. 

नागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सिरियल किलरच्या दोन गुंडांना न्यायालय परिसरातून अटक करण्यात आली. राजेश झिठूलाल मेश्राम (32, रा. बहादुरा फाटा) व कपिल ईश्‍वर मस्करे (23, रा. डिप्टी सिग्नल) अशी अटकेतील गुंडांची नावे आहेत. 

23 ऑक्‍टोबर 2017 रोजी दुर्गेश ऊर्फ छल्ला ध्रुपसिंग चौधरी याने मोहम्मद अरमान (13, रा. लकडगंज) या मुलाचे अपहरण केले होते. इतवारी रेल्वेस्थानक परिसरातील झाडीझुडपात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. विरोध केला असता दगडाने ठेवून मो. अरमानचा खून केला होता. तसेच मुंडके धडापासून वेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. लकडगंज पोलिसांनी दुर्गेशला अटक केली होती. तपासात त्याने नवीन कामठी परिसरात आणखी तिघांची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या दुर्गेश हा न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात आहे. 

या खून प्रकरणात अनेक साक्षीदार आहेत. त्यातील एका साक्षीदाराची 17 जानेवारीला सकाळी न्यायालयात साक्ष होती. त्यापूर्वीच राजेश व कपिल साक्षीदाराच्या घरी गेले. "तुम्ही साक्ष द्यायची नाही. आम्ही न्यायालयात तुम्हाला भेटतो. तुमची साक्ष फिरवून टाका' असा दबाव आणून ठार मारण्याची धमकी दिली. ही माहिती साक्षीदाराने पोलिसांना दिली आहे. 

न्यायालयात रचला सापळा 
पोलिसांनी साक्षीदाराला संरक्षण देऊन न्यायालयात पाठविले. त्याचप्रमाणे पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांच्या पथकाने न्यायालयात सापळा रचला. साक्षीदार न्यायालयाच्या गेटवर उभा असताना दोन्ही आरोपी त्याच्याजवळ आले. इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांनाही पकडले. अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ मो. अरमानच्या खुनातील साक्षीदारांच्या नावांची चिठ्ठी व इतर न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणातील साक्षीदारांच्या नावांची चिठ्ठी सापडली. 

दुर्गेशवर तब्बल 34 गुन्हे 
आरोपी दुर्गेश हा सिरियल किलर असून, त्याच्यावर घरफोडी, दुखापत, जबरी चोरी, दरोडा, दुखापत करून जबरी चोरी करणे असे 34 गुन्हे दाखल आहेत. कळमना हद्दीतील तो कुख्यात गुन्हेगार आहे. दोन वर्षांसाठी त्याला तडीपार केले होते. तरीही वागणुकीत फरक न पडल्याने त्याला स्थानबद्धदेखील केले होते. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने तीन खून, दरोडा टाकण्याचा प्रयत्न आणि घरफोडी केली होती. बनावट कागदपत्रांवर दुसऱ्याचे छायाचित्र लावून त्याने न्यायालयातून जामीन मिळविला होता. या प्रकरणी कळमना पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दहशतीमुळे कुणीही त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी समोर येत नव्हते. तो कारागृहातून सूत्रे हलवीत असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे.

Web Title: Serial Killer moves from jail Two gund are arrested