
साकोली (जि. भंडारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव आता मोठ्या शहरांबरोबरच गावांमध्येही वाढू लागला आहे. मोठ्या शहरांमधून गावी परतलेल्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे हे लोण वाढत असल्यामुळे प्रशासन आणि गावकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथे मंगळवारी (ता. दोन) एकाच दिवशी सात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यात 18 रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महालगाव (सुकळी) येथे आढळलेल्या सात रुग्णांमधील एक तरुण मुंबईवरून 15 मे रोजी महालगाव येथे आला होता. त्यानंतर दोन तरुण 17 मे ला पुणे येथून आले. तर, दोन तरुण सोलापूरवरून 17 मे रोजी आले. त्यांच्यातीलच एक तरुण पुणे येथून 18 मे रोजी आला. त्यांना येथील कटकवार विद्यालयातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. या सातही जणांचे घशाचे नमुने 30 मे रोजी तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. मंगळवारी, या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जेमतेम एक ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या महालगाव या छोट्याशा गावात एकाच दिवशी सात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
एकाच दिवशी सात कोरोनाबाधित आढळताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. गावात जाऊन सर्व लोकांची तपासणी सुरू केली आहे. गावालगत असलेल्या सुकळी, सोनका आणि पळसगाव या गावांना बफरझोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता जिल्ह्यातील 40 पैकी 18 रुग्ण हे एकट्या साकोली तालुक्यातील आहे. तालुक्यातील नवीन सातही रुग्ण महालगाव येथील असल्याने या गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांचे सुकळी गाव बफरझोनमध्ये टाकण्यात आलेले आहे. संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असणाऱ्या या सातही कोरोनाबाधित रुग्णांमुळे केंद्रावर त्यांचा संसर्ग होऊन इतरांनाही कोरोना होण्याची भीती वर्तविली जात आहे. तसेच संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये असणाऱ्या नागरिकांना घरून व गावांतून जेवणाचे डबे पोहोचविले जातात.
कित्येक वेळातर त्यांना खर्रा आणि दारूही पुरविली जाते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दिवसभर शिक्षक, पोलिसांना कर्तव्यावर ठेवले जात असले; तरीही हे नागरिक बऱ्याच वेळा एकत्र येताना दिसतात. यामुळे विलगीकरण केंद्रातही आता कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बऱ्याच केंद्रावर संडास, बाथरूमची व्यवस्था कमी प्रमाणात असल्याने संसर्ग पसरू शकतो. आतापर्यंत साकोली तालुक्यात मिळालेल्या रुग्णांमध्ये पिंडकेपार, सोनेगाव, उसगाव, महालगाव, पळसगाव, सेंदूरवाफा, शिवनीबांध येथील असून या गावात भीतीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.