भयंकर! मुले खेळत होती अंगणात, अचानक शिरलेल्या पीकअपने घेतला चिमुकलीचा जीव

प्रमोद काकडे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम यांचे घर प्रमुख मार्गाला लागून आहे. त्यांची मुलगी अलस्या, अस्मित बंडू मेश्राम, माही बंडू रामटेके ही बच्चे कंपनी अंगणात बसली होती. यावेळी आष्टी येथून भरधाव वेगात येणाऱ्या पीकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मुख्य मार्गावरून हे पीकअप नालीवरून थेट मेश्राम यांच्या अंगणात घुसले.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : जेवण झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात चिमुकले खेळत होते. तेव्हाच रस्ता ओलांडून पीकअप अंगणात शिरले. या अनपेक्षित अपघातात सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. दुसरा बालक गंभीर जखमी झाला, तर तिसरी चिमुकली खड्ड्यात पडल्याने बचावली. गावकऱ्यांच्या काळजाचे पाणी करणारी ही दुर्दैवी घटना गोंडपिपरी- आष्टी मार्गावरील नवेगाव वाघाडे येथे शुक्रवारी (ता. 31) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम यांचे घर प्रमुख मार्गाला लागून आहे. त्यांची मुलगी अलस्या, अस्मित बंडू मेश्राम, माही बंडू रामटेके ही बच्चे कंपनी अंगणात बसली होती. यावेळी आष्टी येथून भरधाव वेगात येणाऱ्या पीकअप वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मुख्य मार्गावरून हे पीकअप नालीवरून थेट मेश्राम यांच्या अंगणात घुसले. या पीकअपने अंगणात खेळत बसलेल्या चिमुकल्यांना जोरदार धडक दिली. यात अलस्या व अस्मित गंभीर जखमी झाले. एका खड्ड्यात माही फेकली गेल्याने ती बचावली. जखमींना गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती केल्यानंतर अलस्याचा मृत्यू झाला. अस्मिताची गंभीर अवस्था बघता तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे करीत आहेत. या दुर्दैवी घटनेने गावात प्रचंड शोककळा पसरली आहे.

मायबापाचे दुदैव
नवेगाव वाघाडे येथील पंढरी मेश्राम हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तहसील कार्यालयात अनेकांची कामे करतात. पंढरीची पत्नी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांना अलस्या ही एकुलती एक मुलगी. आईसोबत ती कॉन्व्हेंटमध्ये शिकायला जायची. काही वर्षापासून पंढरीची प्रकृती बिघडली. कालच्या दुर्दैवी घटनेत एकुलती एक मुलगी कायमची गेल्याने त्यांच्यावर आभाळभर दुः ख पसरले आहे.

तिचे सुदैव
मुख्य मार्गावरील नालीवरून पीकअप अंगणात घुसले. बाजूला असलेले शौचालय फोडून ते थांबले. यावेळी अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यांची दाणादाण उडाली. काही समजण्या पूर्वीच सारचं संपल. अशावेळी अलस्याची नातेवाईक माही शौचालयाच्या खड्‌यात पडली अन्‌ खड्ड्‌यावरून पीकअप समोर गेला. यामुळे ती बचावली.

सविस्तर वाचा - ते दिवसा राहायचे मालक-नोकर अन् रात्री सोबत प्यायचे दारू, तरीही...

कामावर नियंत्रण नाही.
बामणी ते नवेगाववाघाडे या मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. नवेगाव वाघाडेपर्यत मार्गाचे व भूमीगत मोठ्या नालीचेही बांधकाम झालेले आहे. कामाच्या सिमेवर संबंधीत कंत्राटदार कंपनीने दिशादर्शक फलक लावले नाही. हा मार्ग प्रचंड रहदारीचा आहे. अशावेळी सदर कामावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे समोर आले.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven year old girl died in an accident