‘सकाळ’चे भाकित ठरले खरे; यवतमाळात गुलाबी बोंडअळीने ७० टक्के क्षेत्र बाधित

Seventy percent of the area is affected by Yavatmal pink bollworm
Seventy percent of the area is affected by Yavatmal pink bollworm

यवतमाळ : जिल्ह्यात उशिरापर्यंत कापूस जिनिंगमध्ये होता. त्यावेळी योग्य ती काळजी घेतली गेली जात नसल्याने बोंडअळी परतण्याची शक्‍यता दै. ‘सकाळ’ने २२ मे रोचीच्या अंकात वर्तविली होती. सध्याची स्थिती तशीच आहे. जिल्हाभरात बोंडअळीने ७० टक्के क्षेत्र बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उभे असलेले पीक काढले असून, सोयाबीननंतर कापसातही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेतकरी अडथळ्यांची शर्यत नेहमीच पार करीत आले आहेत. त्यानंतरही संकटांनी शेतकऱ्यांचा पाठलाग सोडलाच नाही. गेल्या पाच वर्षांत तर अनेक संकटांत शेतकरी सापडलेत. त्यातूनही पुन्हा उभारी शेतकऱ्यांनी घेतली आहे.

नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोर तीन वर्षांपासून फवारणीतून विषबाधा, गुलाबी बोंडअळी, त्यानंतर आता कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे दोन वर्षांपासून याला ‘ब्रेक’ लागला आहे. यंदा पुुन्हा एकदा बोंडअळीचे आक्रमण झाले आहे.

कोरोनामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक होता. जिनिंगमध्ये कापसाची आवक वाढल्याने ढीग होत आहेत. या ठिकाणी कामगंद सापळे किंवा लाइट ट्रॅप लावणे आवश्‍यक आहे. मात्र, या बाबींची खबरदारी घेण्यात आलेली नाही. याबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित करून हा मुद्दा समोर आणला होता. शिवाय बोंडअळी परत येण्याची भीती व्यक्त केली होती.

सध्या जिल्ह्यातील अनेक भागांत बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने अनेक खबरदारी घेतली होती. बियाण्यांची विक्री, पेरणीचा कालावधी निश्‍चित करून दिला होता. मात्र, त्यानंतरही पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर बोंडअळीचे संकट ओढवले आहे. सध्य:स्थितीत ७० टक्के क्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधित झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी एका वेचणीतच कापूस काढला आहे. जिल्ह्यातील नेर, कळंब, राळेगाव, पांढरकवडा, झरी जामणी आदी तालुक्‍यांत बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीननंतर कपाशी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

नऊ टक्के क्षेत्रात कामगंध सापळे

बोंडअळीवर आळा घालण्यासाठी कामगंध सापळे अत्यंत महत्वाचे आहेत. सरकारने ते शेतकऱ्यांना मोफत वाटायला हवे होते. परंतु, यंदा तशा पद्धतीचे नियोजन झाल्याचे दिसत नाही. कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या पाहणीत नऊ टक्के क्षेत्रावरच कामगंध सापळे आढळून आले. त्यामुळेही बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

कामगंध सापळे लावणे आवश्‍यक होते
यंदा बोंडअळीसंदर्भात योग्य काळजी घेणे गरजेचे होते. बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर कामगंध सापळे लावणे आवश्‍यक होते. मात्र, फार कमी प्रमाणात कामगंध सापळे दिसले. सध्या मोठ्या प्रमाणात बोंडअळी दिसून येत आहे.
- डॉ. प्रमोद यादगीरवार,
सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com