esakal | छायाचित्र टिपणाऱ्याच्या चेहऱ्यावरच चिंतेची छाया
sakal

बोलून बातमी शोधा

photographer.jpg

लग्नसराईमध्ये फोटोग्राफरला मोठी मागणी असते. त्यातून होणारी उलाढालही प्रचंड असते. मात्र, लग्नच थांबल्याने आता या लोकांच्या जीवनमानाला सुद्धा ब्रेक लागल्याची स्थिती आहे.

छायाचित्र टिपणाऱ्याच्या चेहऱ्यावरच चिंतेची छाया

sakal_logo
By
दीपक पवार

कारंजा (जि.वाशीम) : आपल्या आठवणीच्या छबीचे क्षण टिपण्यासाठी कुठल्याही लग्न समारंभात, पार्टीत, वाढदिवस, वा साक्षगंध.... अशा कुठल्याही कार्यक्रमात फोटोग्राफरची आठवण सर्वप्रथम येते. फोटोग्राफर आपल्या प्रत्येक क्षणाची छबी कॅमेराबंद करतो. आणि तीच आयुष्याची आठवण ठरते. मात्र, ऐन लग्न सराईच्या काळातच कोरोनाने कहर केला. त्यामुळे हा व्यवसायही लॉकडाउन झाला आहे. त्यामुळे, उदरनिर्वाहाचे साधन म्हणून इतरांची छबी टिपणाऱ्या छायाचित्रकाराच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया गडद होत आहे.

लग्नसराईमध्ये फोटोग्राफरला मोठी मागणी असते. त्यातून होणारी उलाढालही प्रचंड असते. मात्र, लग्नच थांबल्याने आता या लोकांच्या जीवनमानाला सुद्धा ब्रेक लागल्याची स्थिती आहे. कोरोनामुळे छायाचित्रण व्यवसायाच्या सर्वांत वाईट दिवसांस सुरवात झाली असून, आगामी काळात फोटोग्राफरचे आयुष्य कायम लॉकडाउन होण्याच्या मार्गावर आहे. दहा वर्षांपूर्वी कार्यक्रमास फोटोग्राफरची आवश्यकताही भासायची. त्यामुळे, या व्यवसायात प्रतिष्ठा व पैसा हे दोन्ही बाबी होत्या.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक : ‘त्या’ कोरोना बाधितांच्या संपर्कात आले 39 पोलिस 

त्यामुळेच, अनेक तरुण या व्यवसायात उतरले. उच्चप्रतीचे कॅमेरायुक्त मोबाईल बाजारात आले. प्रत्येकाच्या हाती कॅमेरावाला मोबाईल आला. मात्र, फोटो काढण्याची कला ही छायाचित्रकाराकडेच असते. त्यामुळे, लग्नसराईपुरतेच का होईना आपल्या कलेची झलक दाखविण्यासाठी शिवाय, मोबाईलमुळे मंदावलेल्या फोटोग्राफी व्यवसायला शाबूत ठेवण्याहेतूने अनेक फोटोग्राफर कर्जबाजारी झाले. पुढे काहीतरी चांगले होईल. अशा, आशेने अनेक फोटोग्राफर्सनी कर्ज काढून, बँक, आप्तस्वकीयांकडून उसनवारी करून वेळप्रसंगी व्यवसाय टिकविला. महागडे कॅमेरे खरेदी केले.

हेही वाचा - काय म्हणता, चक्क सावलीच होणार गायब!

चांगले दिवस येतील अशी, आशा असतानाच ऐन हंगाम असलेल्या कालावधीच्या सुरवातीलाच कोरोनाची कुणकुण सुरू झाली. मार्चमध्ये तर कोरोनाने आपला हिसका दाखवण्यास सुरवात केली. देशात लॉकडाउन सुरू  झाले. त्यामुळे, सर्व लग्नसमारंभाचे कार्यक्रम रद्द झाले. याचा सर्वांधीक फटका फोटोग्राफरला बसला. ग्राहकांकडून त्यांना दिलेली आगाऊ रक्कम वापस मागितली जाऊ लागली. दुकानाचे भाडे, प्रपंचासाठी लागणारा खर्च हा भागवायचा कसा? असा, यक्षप्रश्न फोटोग्राफरसमोर निर्माण झाला आहे. 

केवळ लग्नसराईवर अवलंबून असलेल्या फोटोग्राफरचे उत्पन्न लॉकडाऊनमुळे थांबल्याने इतरांच्या छबी कॅमेरा बंद करून आठवणीत ठेवणाऱ्या फोटोग्राफरच्या जीवनातच कोरोनाची ही परिस्थिती निगेटिव्ह कॉपी ठरत आहे. यापुढील प्रवास सुद्धा खडतर असल्याने छायाचित्रकारांचे आयुष्य कायम लॉकडाउन होते की, काय? अशी, चिंता कारंजा तालुक्यातील सदर व्यावसायिकांना लागली आहे.

व्यवसाय आजमितीला संकटात
काही फोटोग्राफर रोजनदारीवर काम करतात. त्यांचा उदरनिर्वाह केवळ फोटोग्राफीवरच अवलंबून आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती डगमगली असून हा व्यवसाय आजमितीला संकटात सापडला आहे.
- प्रशांत बारसे, छायाचित्रकार

कोरोनामुळे ते आर्थिक संकटात
आजच्या घडीला टेक्नॉलॉजीने कमालीची प्रगती केली. मोबाईलमध्येच उच्चप्रतीचे कॅमेरा येत असल्याने जो तो फोटोग्राफर झाला आहे. त्यामुळे, या व्यवसायामध्ये टिकण्यासाठी नवशिख्या तरुणांनी कर्जबाजारी होऊन महागडे कॅमेरे खरेदी केले आहे. मात्र, कोरोनामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
-नितीन जैन, छायाचित्रकार

दाहकता सर्वांनाच बसत
लग्न-समारंभ हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आपल्या आनंदाचे क्षण कैद होण्यासाठी दोन्ही कुटूंबे फोटोग्राफरला महत्व देतात. मात्र, ऐन हंगामातच कोरोनाने कहर केल्याने याची दाहकता सर्वांनाच बसत आहे.
- शीतल बानगावकर, छायाचित्रकार