"तो' शोधतोय जगाच्या पाठीवरचा मराठी माणूस! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

देशाच्या बाहेर गेल्यानंतर मातृभूमीची ओढ जास्त असते. आपल्या देशासोबतची नाळ अधिक घट्ट होते. मी स्वतः अनुभव घेतला आहे. आता या माहितीपटातून जगाच्या पाठीवरील मराठी माणूस आणि त्याचे भावविश्‍व मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. 
-शैलेंद्र साठे 

नागपूर - संमेलनांच्या व्यासपीठांवरून मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता व्यक्त होत असताना दुबईत स्थायिक असलेल्या नागपूरकराने "जगाच्या पाठीवरील मराठी माणूस' शोधण्याचा ध्यास धरला. विखुरलेला मराठी माणूस कॅमेऱ्यात कैद करून अभ्यासपूर्ण माहितीपट करण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली. आखाती देशांमधून प्रारंभ करून वर्षभरात हा माहितीपट जगाच्या पुढे आणण्यासाठी तो सज्ज झाला आहे. 

नागपुरात जन्म, भोपाळमध्ये शिक्षण आणि मुंबईत उच्चशिक्षण घेऊन शैलेंद्र साठे यांनी दुबई गाठले. 14 वर्षांपासून ते दुबईत स्थायिक आहेत. अर्थात ते स्वतः अनिवासी भारतीय (एनआरआय) असून, त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय आहे. मराठी भाषा केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यांत मराठी माणसाच्या माध्यमातून पोहोचली आहे. अशावेळी मराठीविषयी व्यक्त होणारी चिंता शैलेंद्र यांना अस्वस्थ करीत होती. त्यांनी थेट जगभरातील मराठी माणूसच शोधण्याचा निर्णय घेतला. घाईघाईने करण्यापेक्षा पूर्ण अभ्यास व संशोधन करून हा माहितीपट साकारण्याची त्यांनी तयारी केली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात आखाती देशांची निवड केली. 

या मंडळींकडून देश का सोडला, याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आश्‍चर्यचकित करणारी उत्तरे मिळाली. कुणी नोकरीसाठी, कुणी बहिणीचे लग्न आहे म्हणून चार पैसे जास्त कमविण्यासाठी, भारतात पैसा नाही म्हणून, तर कुणी केवळ विदेशात नोकरी करण्याची हौस असल्यामुळे देश सोडल्याचे कारण सांगितले. अशा मंडळींपुढे भारताबाहेर पडल्यानंतरची आव्हानेही फार बिकट असतात, हेही लक्षात आले. विशेषतः दुबईत कायमस्वरूपी नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे निवृत्त झालेल्यांनी मायभूमी व कर्मभूमी यात होणारी दोलायमान अवस्थादेखील व्यक्त केली, असे शैलेंद्र सांगतात. 

संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) जवळपास 50 हजार मराठी माणसं असल्याचा अंदाज ते व्यक्त करतात. त्यामुळे आणखी काही महिने या कामाला लागणार आहेत. 2017च्या अखेरीस होणाऱ्या जागतिक मराठी परिषदेत हा माहितीपट दाखविण्याचे ध्येय त्यांनी डोळ्यांपुढे ठेवले आहे. जगभरातील मराठी माणसाचे भावनिक आणि व्यावहारिक पैलू एखाद्या माहितीपटात संकलित करण्याचा उपक्रम प्रथमच होत आहे. त्यामुळे विक्रम गोखले, महेश काळेसारख्या दिग्गजांनी त्यांच्या कामाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

Web Title: shailendra sathe