शरद पवार गुरुवारी नागपूरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

दौऱ्याचा राजकीय घडामोडींशी संबंध नसून अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी पिकांच्या झालेल्या नुकसानाची ते पाहणी करणार आहेत. 

नागपूर : सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार गुरुवारी (ता. 14) विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. 
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तेचा सारिपाट शरद पवार यांच्याभोवतीच फिरत आहे. कॉंग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही तसेच सत्तेत सहभाही होण्याची भूमिका घेतल्यास मंत्रिपदाचे वाटप व समान कार्यक्रमाची आखणी करण्याची जबाबदारी पवार यांच्यावरच सोपविण्यात आली आहे. सध्या रोज घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे सर्वच पक्षातील बडे नेते मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. या धावपळीतही पवार पीकपाण्याचा आढावाच नव्हे तर बांधावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. 14 नोव्हेंबरला ते पूर्व विदर्भातील पीकपाण्याची पाहणी करणार आहेत. गुरुवारी मुक्काम केल्यानंतर 15 नोव्हेंबरला 
कडबी चौक स्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला दुपारी दोन वाजता ते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पवार यांचा दौरा केवळ सत्तेचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar in nagpur on thursday