'वैदर्भींसाठी अभिमानाची बाब'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नागपूर - कुशल प्रशासक, स्पष्टवक्‍तेपणा आणि शिस्तप्रिय व्यक्‍ती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेले विदर्भाचे ॲड. शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने क्रिकेट वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. ॲड. मनोहरांची निवड ही नागपूर व वैदर्भी क्रिकेटप्रेमींसाठी अभिमान व गौरवाची बाब असल्याची प्रतिक्रिया क्रिकेट संघटक व माजी क्रिकेटपटूंनी व्यक्‍त केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्रिकेट आणखी भरारी घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.   

ॲड. मनोहर यांच्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्‍त करताना माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व विदर्भ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य म्हणाले, मनोहर सरांना ‘एक्‍स्टेन्शन’ मिळाले, ही क्रिकेटसाठी खूप चांगली गोष्ट झाली. त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक चांगली कामे केलीत. त्या कामांची ही एकप्रकारे पावतीच म्हणावी लागेल. आयसीसी प्रमुख असो वा बीसीसीआय अध्यक्ष, क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा एकच त्यांचा ध्यास असतो. त्यांनी आपल्या भूमिकेला नेहमीच न्याय दिला आहे. त्यांच्यासारखा गुणी व लायक प्रशासक आयसीसीला मिळणे, हे जागतिक क्रिकेटसाठी चांगले संकेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात क्रिकेट आणखी उत्तुंग भरारी घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली.   

विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी पदाधिकारी व मीडिया मॅनेजर शरद पाध्ये यांनीही ॲड. मनोहरांच्या निवडीवर आनंद व्यक्‍त केला. ते म्हणाले, क्रिकेटच्या सर्वोच्च संघटनेवर नागपूरच्या व्यक्‍तीची दुसऱ्यांदा निवड होणे, ही विदर्भासह तमाम भारतीयांसाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्यांच्या स्पष्टवक्‍तेपणा व अन्य गुणवैशिष्ट्यांमुळेच त्यांना दुसरी ‘टर्म’ मिळाल्याचे ते म्हणाले.  

व्यवसायाने वकील असलेले ६० वर्षीय मनोहर येत्या २०२० पर्यंत अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत. ते २००८ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१५ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली होती. याशिवाय त्यांनी विदर्भ क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपदही बरीच वर्षे भूषविले आहे. ॲड. मनोहर हे स्वत: आयसीसीच्या प्रमुखपदी दुसऱ्यांदा कायम राहण्यास इच्छुक नव्हते. त्यांनी तसे बोलूनही दाखविले होते. मात्र, जागतिक क्रिकेटची गरज आणि भविष्यातील विकासकामे लक्षात घेता त्यांनी होकार दर्शविला असावा, अशी शक्‍यता आहे.

Web Title: Shashank Manohar re-elected president of International Cricket Council