दानवेंची जीभ कापणाऱ्याला शिवसेनेकडून 10 लाखांचे बक्षीस

चेतन देशमुख
गुरुवार, 11 मे 2017

आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले, अशी असभ्य भाषा रावसाहबे दानवे यांनी वापरली होती.

यवतमाळ - शेतकऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणणाऱ्याला यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले, अशी असभ्य भाषा रावसाहबे दानवे यांनी वापरली होती. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विरोधी पक्षांकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आता भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच यवतमाळमध्ये दानवेंविरोधात आंदोलन केले.

असभ्य भाषा वापरून शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या दानवे यांचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. दानवेसाहेब सत्तेची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका. ही सत्ता शेतकऱ्यांनीच तुम्हाला दिली आहे आणि त्यांनाच 'साले' अशी शिवीगाळ तुम्ही करता? तुमचा हा माज शेतकरी येत्या निवडणुकीत नक्कीच उतरवतील, असे वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केले. दानवे यांच्या फोटोची गाढवावरून पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानापर्यंत धिंड काढण्यात आली.

Web Title: shiv sena agitation against BJP leader Raosaheb Danve in Yavatmal