मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्यावरून शिवसैनिक संतप्त; अटकेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीच्या सरकारने विकासकामांना स्थगिती दिल्याचा आरोप करून भाजपच्या वतीने सोमवारी (ता. 9) हिंगणा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हिंगणा शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

हिंगणा (जि.नागपूर) : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना हा मोर्चा काढण्यात आला. पुतळा जाळणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटक करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने पोलिस आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले निवेदन
महाविकास आघाडीच्या सरकारने विकासकामांना स्थगिती दिल्याचा आरोप करून भाजपच्या वतीने सोमवारी (ता. 9) हिंगणा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हिंगणा शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी पोलिस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना आचारसंहितेचा भंग करून भाजपने मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची कारवाई केली नाही. यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

गुन्हे दाखल करा
मुख्यमंत्र्यांचा पुतळा दहन प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून पळून जाणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना देण्यात आले. तसेच तहसीलदार संतोष खांडरे व ठाण्याचे सारिन दुर्गे यांनाही निवेदन देण्यात आले.निवेदन देणारया शिष्टमंडळात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दिवाकर पाटणे, उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर, जिल्हा संघटिका रचना कनेर, सेना तालुकाप्रमुख जगदीश कनेर, पदाधिकारी मधू पाटील, विष्णू कोल्हे, दीपलक्ष्मी लाड, रूपेश झाडे, विजय नाटके, राजेंद्र कोल्हे, अश्विनी कानेरकर, अर्चना झलके, माधुरी कोल्हे, चित्रा सामने उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena angry after burning statue of Chief Minister; Demand for arrest