'औषध निर्माण कंपनीत राणा दाम्पत्य लाटतंय फुकटचे श्रेय'

shivsena amravati president sunil kharate criticized mp navneet and mla ravi rana
shivsena amravati president sunil kharate criticized mp navneet and mla ravi rana

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकारातून अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये औषध निर्माण कंपनी सुरू होत आहे. मात्र, त्याचे फुकटचे श्रेय राणा दाम्पत्य लाटत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शनिवारी (ता.2) जिल्हाप्रमुख सुनील खराटे व महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून मॅग्नेटीक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत 1 लाख कोटींचे उद्योग राज्यात आणण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नांदगावपेठ एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय हरमन फिनोकेम लिमिटेड या औषध कंपनीला आपला प्रोजेक्ट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हा उद्योग आपणच आणल्याचा खोटा दावा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा करीत आहेत. वास्तविक त्यांचा या प्रकल्पाशी दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. या उद्योगाला जमीन हस्तांतरणास मंजूरी प्रदान करताक्षणी राणा दाम्पत्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतच एमआयडीसीतील काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भूमिपूजन सुद्धा आटोपले. मात्र, ही त्यांची नौटंकी असल्याचा आरोप पराग गुडधे यांनी केला. 

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशान्वये सदर कंपनीला 200 एकर क्षेत्र हस्तांतरित करण्यात आले आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा सुद्धा यामध्ये पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे, असे असताना राणा दाम्पत्याने खोटे श्रेय लुटण्याचा प्रयत्न चालविला आहे. वास्तविक खासदार राणा यांनी आजवर एकही नवीन रेल्वे अमरावतीवरून सुरू केलेली नाही, चिखलदऱ्यातील सीडकोची कामे बंद करण्यात तसेच स्कायवॉकचे काम अडविण्यात राणा दाम्पत्याचा पुढाकार दिसून येत असल्याचा आरोप सुनील खराटे यांनी केला. पत्रपरिषदेला प्रा. प्रशांत वानखडे, नितीन हटवार, पंजाबराव तायवाडे, विकास शेळके आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या मुद्यावर श्रेय लाटण्याचा कुठलाही प्रश्‍न नाही. शिवसैनिकांचा अभ्यास नाही. हा प्रकल्प केव्हा मंजूर करण्यात आला आणि त्यामध्ये आमची भूमिका काय होती? हे स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजे. जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या उद्योगांना आडकाठी आणल्यास मी शांत राहणार नाही.
- नवनीत राणा, खासदार. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com