खासदार भावना गवळी होणार मंत्री?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत.

नागपूर - सलग पाचव्यांदा लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. सलग पाच वेळा निवडून येणाऱ्या विदर्भातील त्या एकमेव महिला खासदार आहेत. या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यामुळे सध्या गवळी वरिष्ठ खासदार आहेत.

गेल्यावेळी 92 हजार मतांच्या आघाडीने निवडून येणाऱ्या भावना गवळींनी या वेळी तब्बल 1 लाख 17 हजार मतांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे पाचही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांना त्यांनी पराभूत केले आहे. 2009चा अपवाद वगळता भावना गवळींच्या मताधिक्‍याचा आलेख चढताच राहिला आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकवत ठेवल्याबद्दल या वेळी त्यांना मंत्रिपद नक्की मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. पक्षप्रमुखांनीदेखील तसे सूतोवाच केल्याचे काहींचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MP Bhavana Gawali Minister Politics