शिवसेना नगरसेवकांचा साचलेल्या  पाण्यात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

अकोला : शहरातील रस्त्यांचा विकास रखडला आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचत आहे. डाबकी रोडवर तर मुख्य रस्ताच पाण्याखाली गेला आहे. याकडे महापालिक प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी विनंती करूनही तोडगा काढण्यात आला नाही. अखेर शिवसेना नगरसेवक राजेश मिश्रा, शशिकांत चोपडे, गजानन चव्हाण यांनी बुधवारी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चक्क रस्त्यावर पाण्यात बसून आंदोलन करीत या समस्येकडे प्रशासन व मनपा पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.    

महापालिका क्षेत्रात येणाऱ्या डाबकी रोडवर मुख्य मार्गावरच ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या रोडवरील श्‍याम पोचदार यांच्या दुकानासह भिरड हॉटेल, मुरली स्विट मार्ट, आंबेडकर मैदानासमोर, श्रीराम टॉवर, प्रिया टॉवरसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील वरदळीच्या मार्गांपैकी एक असलेल्या डाबकी रोडवर शाळा, महाविद्यालयसुद्धा आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नगरसेवकांनी महापौर व मनपा आयुक्तांना निवेदन देवून साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे व येथे पाणी साचू नये म्हणून कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची विनंत केली होती. त्याचा कोणताही लाभ न झाल्याने अखेर नगरसेवकांना बुधवारी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. 

पोलिसांचा ताफा

डाबकी रोडवर साचलेल्या पाण्याचा त्रास होत असल्याने नगरसेवकाने पाण्यात ठिय्या दिल्यावर येथे नागरिकांनी व परिसरातील व्यावसायिकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे संपूर्ण डाबकी रोडवरील वाहतुकीची कोंडी झाली होती. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ताफा बोलाविण्यात आला होता. 

यांची होती उपस्थिती

नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवणीकर, शशिकांत चोपडे, गजानन चव्हाण, महिला आघाडीच्या जोत्सना चोरे, नीलिमा तिजारे, विशाल इचे, सुनील कुकरे, गजानन बोराळे, अमित सावरकर, मदन चोपडे, योगेश गिते आदींसह शिवसैनिक, परिसरातील नागरिक व व्यावसायिंकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल

शिवसेना नगरसेवकांनी डाबकी रोडवर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत जेसीबीच्या सहाय्याने साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी मार्ग करून दिला. त्यामुळे रस्त्यावरील पाणी नाल्यातून निघून जाण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: shivsena protect against municipal corporation