file photo
file photo

अखेर दोन महिन्यांनंतर उघडले हे दुकान...नागरिकांना मिळाला दिलासा

भंडारा : लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर जीवनावश्‍यक साहित्यांच्या दुकानाशिवाय इतर दुकाने आठवड्यातून काही ठराविक दिवशीच उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. तब्बल दोन महिन्यांपासून सलूनची दारे मात्र बंद होती. मात्र गुरुवारी (ता. 21) पालिका मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत सुधारित आदेश देताच शुक्रवारी (ता. 22) स्पा व केशकर्तनालये उघडण्यात आली.

दरम्यान मंगळवार वगळता सप्ताहातील सर्व दिवस सकाळी 9 ते 5 यावेळेत इतर दुकानेही उघडी राहणार आहेत. या निर्णयाने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी अत्यावश्‍यक दुकाने सुरू करण्याबद्दल परवानगी देण्यात आली होती. पूर्वीप्रमाणेच त्यांना ही दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. त्यासाठी पासेसची गरज नाही. मात्र सेवा देताना सामाजिक अंतर, मास्कचा वापर, वैयक्‍तिक स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर असणे बंधनकारक आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी आस्थापनांची आहे.

व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका

गेल्या दोन महिन्यांपासून सलून व स्पा सेंटर्स बंद आहेत. दरम्यान काही दुकाने उघडण्यास सवलत मिळाली. मात्र, या व्यवसायावर निर्बंधच होते. त्यामुळे या व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले. कारागीरसुद्धा संकटात सापडले. अलीकडे अनेकांनी मोठी गुंतवणूक करून दुकानांचे आधुनिकीकरण केले होते. आता स्पा व पार्लर उघडले. त्यांनासुद्धा मोठा आर्थिक फटका बसला. नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी नव्या सुधारित आदेशानुसार सलून सुरू करण्याची परवानगी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

सामाजिक अंतराचे व्हावे पालन

परंतु, सलून चालविताना काही अटींचे पालन करावयाचे आहे. केश कर्तनालयात केस व दाढी करणाऱ्या व्यक्ती सोडून फक्त आणखी एकाच ग्राहकाला आत बसण्याची परवानगी आहे. तसेच ग्राहकांसाठी वापरण्यात येणारे साहित्य निर्जंतुकीकरण केल्यानंतरच उपयोगात आणावे. दाढी केल्यानंतर पुसण्यासाठी वापरण्यात येणारा टॉवेल प्रत्येक ग्राहकांसाठी वेगळा वापरावा आदी अटींचा समावेश आहे. दरम्यान दुकाने उघडल्यानंतर आज पहिल्याच दिवशी सलून दुकांनामध्ये वर्दळ दिसून आली.

नोंदवही ठेवणे बंधनकारक

प्रत्येक व्यावसायिक व सलून चालकांना आपल्या दुकानात नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे. यात दिनांक, ग्राहकांचे नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती ठेवणे अनिवार्य आहे. तसेच आपले दुकान कोणत्या दिवशी व वेळी सुरू राहणार याचे फलकसुद्धा दुकानाच्या दर्शनी भागात लावायचे आहे. तसेच हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझर/साबणाची व्यवस्था असावी. आदेशाचा भंग केल्यास व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड भरावा लागेल.

ही आस्थापने पुढील आदेशापर्यंत बंदच

सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्‍लासेस बंद राहतील. सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम, स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, स्विमिंग पूल, बिअर बार, करमणूक केंद्र, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. रस्त्यावरील चहा टपऱ्या, नाश्‍ता दुकाने, ज्यूस व पाणीपुरी, चायनीज, स्नॅक्‍स सेंटर, पान, खर्रा टपऱ्या बंद राहतील. उपाहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट व प्रार्थनास्थळे पूर्वीप्रमाणेच बंद राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com