esakal | चंद्रपुरातील केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक; जिल्ह्यातील साठा संपला; नागरिकांची गैरसोय 
sakal

बोलून बातमी शोधा

Shortage of corona vaccines in Chandrapur district centers closed

लसीकरणातून कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. दरम्यान, आज गुरवारलाच बल्लारपूर, चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागले.

चंद्रपुरातील केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक; जिल्ह्यातील साठा संपला; नागरिकांची गैरसोय 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंद्रपूर :  दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची आणि बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत विक्रमी वाढ होत असताना आता आरोग्य यंत्रणेसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. 'कोव्हीशिल्ड'चा साठा संपल्याने शुक्रवारपासून जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना कुलूप लावण्याची वेळ आली  आहे. त्यामुळे आता नवा साठा येईपर्यंत लसीकरण ठप्प राहील. लसीकरणासाठी सहा लाख 72 हजार 618 नागरिकांना गृहीत पकडले आहे. यातील एक लाख 32 हजार 169 नागरिकांना लशी दिल्या आहेत. वीस टक्केच लसीकरण पूर्ण झाले असताना 'कोव्हीशिल्ड'च्या तुटवड्याचे संकट निर्माण झाले. त्यामुळे लसीकरणातून कोरोनाची साखळी तोडण्याच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. दरम्यान, आज गुरवारलाच बल्लारपूर, चंद्रपूरसह जिल्ह्यातील काही केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागले.

लशींच्या पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य शासनात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील लशीचा साठा संपला आहे. चंद्रपूूर जिल्ह्यातसुद्धा आज चार हजार आठशे कोव्हीशिल्ड उपलब्ध होत्या. प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालयात, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात साठा वितरित करण्यात आला. तो आजच संपला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून   लसीकरण केंद्रांना कुलूप लागण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, एक लाख 26 हजार लशींची मागणी जिल्ह प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. 

अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी पक्षातर्फे साक्ष नोंदणी पूर्ण; ऍड. उज्वल निकम यांची माहिती 

चंद्रपूर जिल्हयात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्यात आरोग्य सेवक आणि दुसऱ्या टप्यात महसूल, पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले. एक एप्रिलपासून 45 आणि साठ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आतापर्यंत एक लाख हजार 169 नागरिकांना पहिला डोस आणि 16 हजार 745 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एक लाख 48 हजार 914 नागरिकांना डोस देण्यात आले. 

माझे कुटुंब माझा जबाबदारी सर्वेक्षणात 22 लाख 42 लोकसंख्या लसीकरणासाठी गृहीत धरण्यात आली. त्यापैकी 60 वर्षावरील 10 टक्के, 45 ते 60 वर्ष दरम्यानची 20 टक्के असे एकूण 6 लाख 72 हजार 618 नागरिक लसीकरणासाठी गृहीत धरले आहे. सध्या जिल्ह्यात 98 लसीकरण केंद्रे आहेत.  पुढील दोन महिन्यांत लसीकरण पूर्ण करायचे आहे. त्यामुळे भविष्यात दोनशे लसीकरण केंद्रांची गरज पडणार आहे. मात्र, तत्पूर्वीच कोव्हीशिल्डचा साठा संपला. त्यामुळे लसीकरण केंद्र ठप्प झाले आहे. 

मनपा क्षेत्रात तुटवडा

चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व आठही केंद्रांवरील लशी संपल्या आहेत.  नवीन साठा दिला तरच उद्या लसीकरण शक्‍य असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरात महापालिकेचे एकूण आठ केंद्रे आहेत. एका केंद्रावर रोज शंभर लोकांना लस दिली जात आहे. आजवर 28 हजार लशी या केंद्रांवरून देण्यात आल्या. मात्र आता साठा संपला असून, आजचा दिवस कसातरी काढण्यात आला. 

उद्यापर्यंत लसी उपलब्ध झाल्या नाही, तर ही केंद्रे बंद करण्याची वेळ महापालिकेवर येऊ शकते. महापालिकेच्या सात केंद्रांवर कोविशील्ड, तर एका केंद्रावर कोव्हक्‍सीन लस दिली जात आहे. यापैकी कोविशील्ड ही लस पूर्णपणे संपली आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढली असून, लशी उपलब्ध झाल्या नाहीतर उद्या चंद्रपूर शहरातील केंद्रे बंद पडू शकतात.

आजारी वृद्धेस रस्त्यात टाकून आप्तांचे पलायन; प्रकृती गंभीर होऊ लागल्याने सोडले वाऱ्यावर

कोरोनाच उद्रेक सुरूच

जिल्ह्यात मागील 24 तासात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 668 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 168 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 918 झाली आहे. सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 56 हजार 203 नमुने निगेटिव्ह आले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image