esakal | पुण्यावरून कधी येणार कोविड लसीचा साठा? गोंदियात तुटवडा; आरोग्य यंत्रणेचे नियोजन कोलमडले

बोलून बातमी शोधा

Shortage of covid vaccine in Gondia The planning of the health system collapsed

सोमवारी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ २०० डोसेस, तर बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ७० डोसेस दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, एक एप्रिलपासून को-व्हॅक्‍सिनचा स्टॉकच नसल्याचे समोर आले आहे.

पुण्यावरून कधी येणार कोविड लसीचा साठा? गोंदियात तुटवडा; आरोग्य यंत्रणेचे नियोजन कोलमडले
sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

गोंदिया : कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. शहरासह जिल्ह्यात या मोहिमेने वेग घेतला असतानाच सोमवारी गोंदियात लसींचा तुटवडा असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे नियोजन कोलमडले आहे. पुण्यावरून साठा येणार नाही, तोपर्यंत लसीकरण थांबवावे लागेल की काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

राज्य, विदर्भच नव्हे तर जिल्ह्यातदेखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा आजार कायमचा दूर व्हावा, असे प्रत्येकालाच वाटत आहे. यातच शासनाने ४५ वयोगट व त्यापुढील वयोगटांतील नागरिकांना लस देण्याचे काही दिवसांपूर्वीच ठरविले. त्यादृष्टीने लसीकरणदेखील केले जात आहे.

जाणून घ्या - अत्याचारानंतर विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती; ‘हेल्थ चेकअप’मध्ये आले सत्य पुढे

सुरुवातीला अफवांच्या बाजारात नागरिक लसीकरणाला प्रतिसाद देत नव्हते. परंतु, आता आजाराची तीव्रता ओळखून प्रत्येकजण लसीकरणासाठी तयार होत आहेत. असे असतानाच गोंदियात लसींचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. सोमवारी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात २०० ते २५० तसेच बाई गंगाबाई महिला रुग्णालयात १०० ते १३० केवळ एक दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

साठ्याच्या उपलब्धतेनुसार, सोमवारी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ २०० डोसेस, तर बाई गंगाबाई महिला रुग्णालयात ७० डोसेस दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, एक एप्रिलपासून को-व्हॅक्‍सिनचा स्टॉकच नसल्याचे समोर आले आहे. एक दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याने उद्या काय? याचे उत्तरदेखील आरोग्य विभागाकडे नव्हते. मग पुण्यावरून साठा येईपर्यंत लसीकरण थांबवावे लागेल की काय, हा प्रश्‍न कायम आहे.

अधिक वाचा - कुख्यात गुंड रणजित सफेलकरवर माजी मंत्र्यांचा वरदहस्त, पाच-पन्नास रुपायांची सवारी मारणारा ऑटोचालक झाला कोट्यधीश

मोहिमेला जोमाने सुरुवात केली जाईल
दोन दिवस गावस्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. साडेआठ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. पुण्यावरून लसी उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण मोहिमेला जोमाने सुरुवात केली जाईल. सध्या तुटवडा मात्र, कायम आहे.
- श्री. कापसे,
जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया