श्रद्धा की अंधश्रद्धा? राजदेवबाबांना श्रद्धेपोटी करतात बिडी, तंबाखूचा नैवद्य अर्पण

राज इंगळे
Monday, 8 February 2021

आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले राजदेवबाबा खरोखरच बिडी पितात काय? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, मेळघाट दर्शन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बिडीवाले बाबांच्या ठिकाणाला भेट देण्याची कमालीची उत्सुकता लागल्याचे दिसून येते.

अचलपूर (जि. अमरावती) : मेळघाटातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले राजदेवबाबा हे ठिकाण सध्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे ठिकाण झाल्याचे मानले जाते. आदिवासी बांधव श्रद्धेपोटी येथे तंबाखू, बिडीचा नैवद्य अर्पण करतात. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हा संशोधनाचा विषय झाला आहे.

चिखलदरा तालुक्‍यातील खोंगडा गावापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोट ते धारणी फाट्यावर राजदेवबाबाची मूर्ती आहे. याच राजदेवबाबांना बिडीवाले बाबांच्या नावाने ओळखले जाते. ते बिडीवाले बाबा परिसरातील आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान आहेत. येथील आदिवासी बांधव कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी याठिकाणी राजदेवबाबांना बिडी, तंबाखूचा नैवद्य अर्पण करतात.

अधिक वाचा - मातृत्व अनुभवण्यापूर्वीच झाला बाळाचा मृत्यू, महिलेचं कृत्य पाहून उपस्थितांचेही पाणावले डोळे

विशेष म्हणजे, लग्नाची पहिली पत्रिका राजदेवबाबांच्या चरणी अर्पण केली जाते. याठिकाणी भेट देणारा प्रत्येक जण श्रद्धेपोटी राजदेवबाबाला बिडी, तंबाखू, सिगारेटचा नैवद्य अर्पण करतो. त्यामुळे राजदेवबाबांच्या मुखात नेहमी बिडी, सिगारेट पाहायला मिळते. अवतीभवती विविध प्रकारच्या तंबाखू, गुटख्याच्या पुड्या दिसून येतात.

आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले राजदेवबाबा खरोखरच बिडी पितात काय? हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, मेळघाट दर्शन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बिडीवाले बाबांच्या ठिकाणाला भेट देण्याची कमालीची उत्सुकता लागल्याचे दिसून येते. याठिकाणी दररोज पर्यटक भेट देत असल्याची माहिती समोर येत आहे.

जाणून घ्या - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते अंकितासोबत गतवर्षी ३ फेब्रुवारीला

मेळघाटात पर्यटकांची संख्या वाढली

सध्या मेळघाटात पर्यटकांची संख्या वाढली आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या वतीने मेळघाटात विविध सुविधा निर्माण होत असल्याने पर्यटकांची पावले मेळघाटकडे वळत आहेत. त्यात मेळघाटात बिडीवाले बाबा प्रकाशझोतात आल्याने पर्यटकांना एकदा तरी राजदेवबाबा ऊर्फ बिडीवाले बाबांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे वाटत असल्याचे मेळघाटात आलेल्या पर्यटकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddhasthan of Ramdev Baba tribal brothers in Melghat