जमिनीच्या मोबदल्यासाठी आज मुख्यमंत्र्यांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

वर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता पिपरी (मेघे) व पांढरकवडा येथील 87 शेतकऱ्यांची जमीन संपादनाचा शासनाने एप्रिल महिन्यात करारनामा केला. मात्र, चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नाही. करारनाम्यानुसार आम्हाला त्वरित मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी गुरुवारी (ता. 1) सर्कसग्राउंड रामनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालणार आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गजानन महाराज मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पिपरी (मेघे) आणि पांढरकवडा येथील शेतकरी उपस्थित होते. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीकरिता 18 जानेवारी 2019 ला सूचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर भूसंपादनाची घोषणा केली. पिपरी (मेघे) व पांढरकवडा येथील 87 शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांनी संमती दिल्यानंतर मोजणी झाली. जमीन संपादन करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, वर्धा यांच्याकडे आक्षेप मागविण्यात आले होते. शेतकऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. करार झाल्यानुसार शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही, असे सांगितले होते. मात्र, चार महिने लोटूनही शेतकऱ्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यावेळी शेतकऱ्यांना शेताची मशागत व पेरणी न करण्यास सांगितले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जमीन पडीक ठेवली. पैसे देऊन लवकरात लवकर काम सुरू करीत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले होते. करारानुसार आम्हाला त्वरित मोबदला मिळावा, याकरिता शेतकऱ्यांनी संबंधितांना वारंवार विचारणा केली. नकाशात बदल झाला असला तरी आम्ही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे त्यावेळी समृद्धी मार्गाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. मात्र, अद्यापही आम्हाला मोबदला मिळाला नाही. करारानुसार इंटरचेंजकरिता घेतलेल्या जमिनीचा त्वरित मोबदला देण्यात यावा, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siege the CM today for land compensation