दुसऱ्या महायुद्धातील सिल्व्हर स्पिटरफायर विमान नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

नागपूर : दुसऱ्या महायुद्धात उपयोगात आणण्यात आलेले सिल्व्हर स्पिटरफायर विमान सोमवारी सोनेगाव एअरफोर्स स्टेशनवर डेरेदाखल झाले आहे. तब्बल 62 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे विमान भारतीय आकाशात उडताना दिसले. 

नागपूर : दुसऱ्या महायुद्धात उपयोगात आणण्यात आलेले सिल्व्हर स्पिटरफायर विमान सोमवारी सोनेगाव एअरफोर्स स्टेशनवर डेरेदाखल झाले आहे. तब्बल 62 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे विमान भारतीय आकाशात उडताना दिसले. 
विश्‍वयुद्धात सिल्व्हर स्पिटरफायर या सिंगल इंजिन विमानाचा वापर महत्त्वपूर्ण ठरला होता. वैमानिक स्टीव बुक आणि जेम्स पैट हे या ऐतिहासिक विमानाला घेऊन विश्‍वभ्रमणाला निघाले आहेत. वेगवेगळ्या देशांना भेटी देत 2 नोव्हेंबर रोजी हे विमान भारतीय वायुहद्दीत दाखल झाले. त्यानंतर सोमवारी सोनेगाव एअरफोर्स स्थानकावर विसावले. विमानाच्या दोन्ही वैमानिकांचे स्टेशन कमांडर तिवारी यांनी स्वागत केले. ते दोघेही या विमानासह सुमारे 27 हजार मैलांची यात्रा पूर्ण करणार असून एकूण 29 देशांतील वेगवेगळ्या शंभर ठिकाणांना भेटी देतील. भेटीप्रसंगी ते या विमानाच्या द्वितीय महायुद्धातील वापराबाबत माहिती देतानाच यात्रेच्या आयोजनामागील हेतूसुद्धा विशद करीत आहेत. नागपूर भेटीवर आलेल्या स्टीव बुक आणि जेम्स पैट यांनी त्यांच्या यात्रेतील रोमांचक क्षणांची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांना चर्चेदरम्यान दिली. 
या अभियानाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात इंग्लंड येथून झाला. द्वितीय महायुद्धादरम्यान ज्याही देशांमधून या विमानाचे उड्डाण झाले, त्या सर्व देशांना भेटी देण्याची स्टीव बुक आणि जेम्स पैट यांची योजना आहे. यापूर्वी सुमारे 62 वर्षांपूर्वी या विमानाने भारतीय आकाशात झेप घेतली होती. त्यानंतर आज नागपूरकरांनी या विमानाची झलक पुन्हा अनुभवली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Silver Spitfire aircraft in Nagpur, World War II