जलतरणपटूचा बुडून मृत्यू

Swimmer
Swimmer

नागपूर - मेडिकल स्विमिंग पूलमध्ये एका नवशिकाऊ युवा जलतरणपटूचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली. नवीन छगनराव श्रीराव (वय २२) असे मृत जलतरणपटूचे नाव आहे. कंत्राटदाराचे दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वर मार्गावरील रेणुका मातानगर येथे राहणाऱ्या नवीनने १५-२० दिवसांपूर्वीच स्विमिंग लावले होते. येथील जलतरण तलावावर नियमित स्विमिंग करायचा. रोजच्या प्रमाणे तो बुधवारी सायंकाळी सहानंतर तलावावर पोहायला आला. पोहता पोहता तो अचानक गटांगळ्या खाऊ लागला. नवीन बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे उपस्थित प्रशिक्षक, सराव करीत असलेले डॉक्‍टर्स व अन्य जलतरणपटू धावले. त्यांनी लगेच नवीनला बाहेर काढून ॲम्ब्युलन्सने मेडिकलमध्ये भरती केले. आयसीयूमध्ये उपचारादरम्यान त्याचा रात्री साडेबारा वाजता मृत्यू झाला. नवीनने चुकून श्‍वास घेतल्याने व तोंड उघडे ठेवल्याने त्याच्या नाकातोंडाद्वारे पाणी फुप्फुसात गेले. ऑक्‍सिजन न मिळाल्याने ब्रेन डेड झाले. त्याही परिस्थितीत डॉक्‍टरांनी प्रयत्नांची शर्थ करीत नवीनला वाचविण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. नवीन अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. अलीकडेच ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मध्ये त्याची निवड झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे कुटुंबीय आनंदात होते. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने त्यांच्यावर मोठा आघात झाला आहे.

यासंदर्भात स्विमिंग पूलचे कंत्राटदार दिलीप हेलचेल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी निष्काळजीपणाचा आरोप फेटाळून लावला. नवीन त्याच्या स्वत:च्या चुकीमुळेच बुडाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, नवीन रात्री नऊ ते दहाच्या बॅचमध्ये स्विमिंग करायचा. मात्र, काल तो सहा-सातलाच आला. बॅचची वेळ संपल्याने घंटी वाजवून सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले.

मात्र, नवीनने अतिउत्साहाच्या भरात पाण्यात उडी घेतली. पाणी साडेसात फूट खोल असल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. पोरांनी आरडाओरड केल्यानंतर लगेच त्याला बाहेर काढण्यात आले. नाकातोंडाद्वारे फुप्फुसात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com