सिंदीबिरी होणार पहिले ‘कॅशलेस’ गाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

प्रशासन आशावादी; व्यवहार सुरू; २६ जानेवारीपर्यंत शिक्कामोर्तब

देवरी - अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सिंदीबिरी गावात ‘कॅशलेस’ व्यवहाराला सुरुवात झाली आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत संपूर्ण गाव ‘कॅशलेस’ व्यवहार करेल, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला असून, ‘कॅशलेस’ म्हणून सिंदीबिरीला जिल्ह्यातील पहिल्या गावाचा बहुमान मिळणार आहे. 

प्रशासन आशावादी; व्यवहार सुरू; २६ जानेवारीपर्यंत शिक्कामोर्तब

देवरी - अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सिंदीबिरी गावात ‘कॅशलेस’ व्यवहाराला सुरुवात झाली आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत संपूर्ण गाव ‘कॅशलेस’ व्यवहार करेल, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला असून, ‘कॅशलेस’ म्हणून सिंदीबिरीला जिल्ह्यातील पहिल्या गावाचा बहुमान मिळणार आहे. 

देवरी तालुक्‍यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जेठभावडा ग्रामपंचायत अंतर्गत सिंदीबिरी गाव येते. या गावाची लोकसंख्या ७५३ इतकी असून, संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाले आहे. दरम्यान, शासनाने कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी याबाबत जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीला प्रतिसाद देत सिंदीबिरी येथील प्रत्येक व्यावसायिक व नागरिकांनी देवाण-घेवाणीचे व्यवहार कॅशलेस सिस्टमद्वारे करण्यास सुरुवात केली आहे. गावातील पानटपऱ्या, किराणा दुकान आणि बिअर बार या ठिकाणी कुठल्याही रकमेचे देवाण-घेवाण कॅशलेस सिस्टमद्वारे होत आहे. हा उपक्रम राबविण्याकरिता उपविभागीय अधिकारी मिलिंद टोणगावकर, तहसीलदार संजय नागतिळक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. एम. पांडे, सरपंच जितेंद्र रहांगडाले, तलाठी उपरीकर, सचिव एस. डब्ल्यू. बन्सोड यांनी पुढाकार घेतला. कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार, संपूर्ण व्यवहार कॅशलेस केले जात आहेत. येत्या २६ जानेवारीपर्यंत सिंदीबिरी गाव संपूर्ण कॅशलेस होईल, असा आशावाद प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. सिंदीबिरी हे गाव जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव म्हणून नावारूपास येणार आहे. 

प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या पुढाकाराने सिंदीबिरी हे जिल्ह्यातील पहिले कॅशलेस गाव होत आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानदार, व्यापारी यांचे नाव, बॅंकेचे खाते, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड आदी दर्शनी भागावर लावण्यात आले आहे. गरजू व्यक्तींनी  मागणी केल्यास बॅंक ऑफ इंडियाकडून पाइंट ऑफ मशीन (पीओएस) पुरविण्यात येईल. तहसीलस्तरावरील कर्मचाऱ्यांनी प्रतिकर्मचारी २०० कुटुंबे दत्तक घेतली आहेत. 
- संजय नागतिळक, तहसीलदार देवरी.

Web Title: sindibiri village is cashless