तिजनबाईंच्या पेहरावावर नागपुरी छाप!

योगेश बरवड
मंगळवार, 5 मार्च 2019

नागपूर - देशभरात प्रसिद्ध पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई यांच्या पेहरावावर नागपुरी छाप आहे. होय, हे खरे आहे. छत्तीसगडच्या महिला परिधान करीत असलेली परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण साडी संत्रानगरीतच तयार होते आणि इथूनच त्यांचा पुरवठा होतो. कालौघात फॅशन बदलली, परिणामी परंपरागत साड्यांची निर्मिती करणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसला आहे. 

नागपूर - देशभरात प्रसिद्ध पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई यांच्या पेहरावावर नागपुरी छाप आहे. होय, हे खरे आहे. छत्तीसगडच्या महिला परिधान करीत असलेली परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण साडी संत्रानगरीतच तयार होते आणि इथूनच त्यांचा पुरवठा होतो. कालौघात फॅशन बदलली, परिणामी परंपरागत साड्यांची निर्मिती करणाऱ्या यंत्रमाग व्यवसायाला त्याचा मोठा फटका बसला आहे. 

विविधतेने नटलेल्या नागपूर नगरीतील कापडनिर्मिती उद्योगातही विविधता आहे. प्रामुख्याने हलबा समाजाने २०० वर्षांपूर्वी नागपुरात कापडनिर्मिती उद्योगाची पायाभरणी केली. बारीक धाग्यापासून तलम नववारी निर्मितीत त्यांचा हातखंडा आहे. हलबांपाठोपाठ मुस्लिम समाजातील विणकरांनी कापडनिर्मिती सुरू केली. जाडसर धाग्यापासून भरजरी साड्या आणि कपड्यांची निर्मिती हा त्यांचा वेगळेपणा ठरला. 

विदर्भासह महाराष्ट्रात तलम नववारीने छाप पाडली, तर छत्तीसगडच्या कष्टकरी महिलांनी दीर्घकाळ चालणाऱ्या जाड्याभरड्या साडीला जवळ केले.

आजही छत्तीसगडच्या ग्रामीण भागातील मध्यमवयीन ते ज्येष्ठ महिलांच्या अंगावर तीच वैशिष्ट्यपूर्ण साडी दिसते. या साड्यांची निर्मिती आणि विक्रेत्यांना पुरवठा मोमिनपुऱ्याजवळील अन्सारनगरातून होतो.
एकेकाळी लाखोंच्या संख्येने नागपुरातून साड्यांची मागणी व्हायची; पण काळ बदलला, तशी फॅशनही बदलली. अलीकडे तर ‘डेलीसोप’मुळे रोजच फॅशन बदलत आहे. सातत्याने बदलणारी फॅशन यंत्रमाग उद्योगाला फटका देणारी ठरली आहे. छत्तीसगडमधून साड्यांची मागणी आजही कायम असली तरी पूर्वीच्या तुलनेत ती फारच कमी आहे. परिणामी व्यावसायिक आणि कारागीर अडचणीत सापडले आहेत.

नागपुरी ‘टेक्‍स्चर’ची मोहिनी
देशाच्या मध्यभागी असणाऱ्या नागपूरचे वातावरण फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर वर ही बाब जाणवत नसली तरी, वातावरणातील वेगळेपणामुळेच जिभेवर ठेवताच विरघळणारी सोनपापडी येथे तयार होते. हेच वातावरण दर्जेदार कापडांच्या निर्मितीसाठीही पोषक आहे. देशाच्या अन्य कोणत्याही भागांच्या तुलनेत येथील कपड्यांचे टेक्‍स्चर, रंग आणि चमक हटकेच असते. हाच वेगळेपणा ग्राहकांना आकर्षित करणारा ठरतो. या वेगळेपणासाठी येथील ‘आबोहवाच’ सहायक असल्याचे यंत्रमाग व्यावसायिक के. ए. अंसारी यांचे म्हणणे पडले. नागपूरपासून केवळ १५ किमीच्या अंतरावरच कामठी आहे. दोन्ही ठिकाणी पाणीसुद्धा कन्हान नदीचेच येते. समान संसाधने असूनही टेक्‍स्चर, चमक आणि रंगात नागपुरी कापडच उजवे ठरत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Singer Tijanbai