खुनाच्या इरादयाने आरोपी आला होता बहिणीकडे 

pavankar hatyyakand.jpg
pavankar hatyyakand.jpg

नागपूर : आधीच आर्थिक विवंचना, त्यात बहीण व जावयाने पैसे आणि शेतीसाठी तगादा लावला. त्यातून उद्‌भवलेल्या आर्थिक कोंडीला वैतागून विवेक पालटकरने जावयाच्या हत्येचा कट रचला. सबलीने जावयावर वार केला. पण, हा फटका भाची वेदांती आणि मुलगा कृष्णाच्याही वर्मी लागला. नंतर पुढे आलेली बहीण व तिच्या सासूलाही या सैतानाने संपविले, अशी कबुली विवेकने दिल्याची माहिती सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

आरोपीला पत्नीच्या हत्येच्या आरोपातून सोडविण्यासाठी न्यायालयीन लढ्यात आलेला खर्च, शेतीतील दोन एकरांचा हिस्सा जावई कमलाकर पवनकर यांना हवा होता. शिवाय खासगी सुरक्षारक्षक म्हणून मिळणाऱ्या 6 हजार वेतनातूनही दरमहा 5 हजार रुपयेसुद्धा ते मागत होते. अर्चनाकरवी सतत फोन करून जावईच त्रास देत असल्याची त्याला शंका होती. यामुळे त्याने जावयाच्या हत्येचा कट रचला. 10 जूनला रात्री 9 च्या सुमारास तो पवनकर यांच्याकडे गेला. सोबत आणलेली सब्बल त्याने गेटजवळ आडवी ठेवली आणि गेट वाजविले. कुणी बाहेर न आल्याने समोरच राहणाऱ्या व्यक्तीने पवनकर यांना फोन केला. यानंतर बहीण अर्चनाने दार उघडून त्याला आत घेतले. 

रात्री 3 च्या सुमारास तो उठला. भिंतीवरून उडी मारून त्याने सब्बल आणली. पहिला घाव जावयावरच घातला. मुलगा आणि भाची जवळच असल्याने त्यांच्या डोक्‍यावरही दणका बसला. आवाजामुळे बहीण अर्चना उठली. आरोपीने तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. यानंतर पुन्हा मृतांच्या डोक्‍यावर सबलीने घाव घातले. कमलाकर यांच्या आईसुद्धा आवाज ऐकून आल्या. समोर बघताच त्यांचीही हत्या केली. 

महिनाभर ठेवली होती जावयावर पाळत 
पैसे आणि शेतीसाठी त्रास देत असल्याने क्रूरकर्मा विवेक पालटकरने जावयाच्या हत्येचा निश्‍चय केला होता. चौकात किंवा इतरत्र त्यांना लोळवायचा त्याचा बेत होता. यासाठी महिनाभर पाळत ठेवली होती; मात्र तशी संधीच सापडत नसल्याने वैतागून त्याने घरीच जाऊन सर्वांना मारले. 

रेल्वेतून पळाला 
घटनेनंतर भाड्याच्या खोलीत गेला. आवश्‍यक सामान सोबत घेऊन ऑटोने रेल्वेस्थानकावर आला. दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला. दिल्लीतून त्याला चंदीगडला जायचे होते. वाटेत लुधियाना स्थानकावर उतरला. तिथे एका स्थानिकाच्या मदतीने सैनिवाल ठाणे हद्दीतील झोपडपट्टीत थांबला. 

असा अडकला विवेक 
विवेकने सोबत दोन मोबाईल नेले होते. पकडले जाण्याच्या भीतीने ते बंद करून ठेवले होते. आश्रय देणाऱ्या व्यक्तीसोबत 50 हजार चोरल्याचा वाद झाला. त्याने विवेकचा मोबाईलही चोरला. त्यात आपले सिमकार्ड टाकून मोबाईल सुरू करताच पोलिसांना कनेक्‍शन मिळाले. नागपूर पोलिसांनी संबंधित पोलिसांना दक्ष केले. एक पथक 19 जूनला या भागात पाठविले. 

पूजा मनःशांतीसाठी 
विवेकच्या खोलीत लिंबू, हळद-कुंकू यासारखे साहित्य सापडल्याने जादूटोण्यातून हत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. पण, जादूटोणा नाही तर पूजेमुळे मनःशांती मिळेल. शीघ्रकोपीपणा कमी होईल, या आशेने तो पूजा करीत असल्याचे पुढे आले आहे. 

मुलाला मारल्याचाही पश्‍चात्ताप नाही 
जावई पवनकर यांच्या शेजारीच मुलगा झोपला असल्याचे विवेकला माहिती होते. त्यांच्यावर वार केल्यास मुलालाही इजा होईल याची जाणीव असूनही त्याने वार केला. पोटच्या गोळ्याला संपविल्याचे त्याला तेव्हाच माहिती होते. पण, मुलासह बहिणीचे कुटुंब संपविल्याचा कोणताही पश्‍चात्ताप त्याला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com